स्मरण, सौजन्य –
मधाळ गायकीने हिंदी चित्रपटसंगीतावर अमीट छाप उमटविणारे मोहम्मद रफी यांचं निधन होऊन परवाच्या ३१ तारखेला ३३ वष्रे झाली, मात्र आजही त्यांच्या स्वरांची मोहिनी ओसरलेली नाही. जवळपास सर्व संगीतकारांकडे गाणी गाणारे रफी सर्वाधिक खुलले ते ओ. पी. नय्यर यांच्याकडे गाताना. रफी आणि ओपी हे सांगीतिक समीकरण म्हणजे जादूचा पेटाराच आहे.
रफीला गोड आणि हळुवारपणे गायला मी शिकवलं, नाहीतर तो नौशादकडे केवळ भगवान भगवान.. करत बसला असता.. ‘गाईड’मधील ‘तेरे मेरे सपने..’ हे गाणं कमालीचं लोकप्रिय झाल्यानंतर संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी उत्तेजित होऊन या प्रकारे भावना व्यक्त केल्या होत्या (अर्थात ही चाल त्यांची की जयदेवची हा प्रश्न उरतोच. कारण या गाण्यावर तेव्हा त्यांच्याकडे साहाय्यक असणाऱ्या जयदेवची छाप सहज दिसून येते.). सचिनदांचा रोख होता तो ‘बजू बावरा’ या चित्रपटातील ‘ओ दुनिया के रखवाले..’ या गाण्याच्या दिशेने. लता-मदनमोहन, आशा-ओपी, किशोर-आरडी याप्रमाणे रफींना ऐकावं तर नौशाद यांच्याकडेच. नौशाद यांनी रफींच्या गायकीचा योग्य उपयोग करून घेतला, असं एक मिथक तेव्हा चघळलं जात असे, या गरसमजुतीला अजूनही मान्यता आहेच. आणखी एक मिथक म्हणजे नौशाद यांनी शास्त्रीय संगीताचा फार चांगला वापर केला आणि अभिजात संगीत पुढे नेलं वगरे वगरे.. नौशाद यांनी रागदारीवर गाणी दिली हे खरं आहे. मात्र त्यात त्यांचं काँट्रिब्युशन ते काय, हजारो वर्षांपासून चालत आलेले राग त्यांनी तसेच्या तसे वापरले. उलट सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदनमोहन, रोशन, सलील चौधरी यांच्यासारख्या संगीतकारांनी शास्त्रीय संगीत वापरलंच, मात्र त्यात स्वत:च्या प्रतिभेची भरही घातली. रफींच्या बाबतीत बोलायचं झालं तर नौशाद यांनी रफींना चांगली गाणी दिली यात शंकाच नाही. परंतु ही गाणी बारकाईने ऐका, एखादा शिष्य त्याच्या गुरूसमोर काहीसा संकोचाने गातोय, असं वाटून जातं. नौशाद यांच्याकडे ते मुक्तपणे गायल्येत असं दिसत नाही. ओंकारप्रसाद ऊर्फ ओ. पी. नय्यर यांच्यासाठी गाताना मात्र रफी यांच्या स्वरांचा वारू चौखूर उधळलाय! बेधुंद, दिलखुलास, तरुणाईला साद घालणारं संगीत देण्यात ओपी यांचा हातखंडा होता. अशा चालींना न्याय देण्यासाठी त्यांना एकाच काळात आशा भोसले आणि मोहम्मद रफी गवसले हा चित्रपटसृष्टीसाठी भाग्ययोग होता (गीता दत्त यांच्यावर ओपींनी अन्याय केला, असं म्हटलं जातं. मात्र तिच्यापेक्षा आशा भोसले सरस होत्या, यात शंका नाही.). १९५५ मध्ये आलेला ‘मि. अॅण्ड मि. 55’ आणि त्यानंतरच्या वर्षी दाखल झालेल्या ‘सीआयडी’ने ओपी आणि रफी जोडी अधिक जवळ आली. ओपी यांना रफीविषयी इतका जिव्हाळा व खात्री की ‘सीआयडी’मधील ‘आँखो ही आँखों में इशारा हो गया..’ या गाण्यातील केवळ एका ओळीसाठी त्यांनी रफींना पाचारण केलं. यानंतर या जोडगोळीने धमालच उडवून दिली. ‘नया दौर’ आणि ‘तुमसा नही देखा’मधील गाण्यांमुळे तर साक्षात शंकर-जयकिशन यांचे सिंहासन डळमळले. राज कपूर, दिलीपकुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तीचे संगीतकार ठरलेले होते, तरीही राज कपूरची भूमिका असलेला ‘दो उस्ताद’ हा चित्रपट ओपींकडे आला. यातील गाणी ऐकून खूश झालेल्या राजने ओपींना हळूच विचारले, मुकेशच्या आवाजात ही गाणी आणखी चांगली वाटतील नाही, यावर ओपींनी ठणकावून सांगितले, ही गाणी मुकेशच्या आवाजात भयंकर वाटतील, माझी गाणी रफीशिवाय कोणी गाणार नाही, मुकेशचा हट्ट धरणार असशील तर मी हा चित्रपट सोडतो. बिचाऱ्या राजला रफींचा आवाज घ्यावा लागला. हाच स्वभाव ओपी यांना नडला आणि साठनंतर त्यांना कमी चित्रपट मिळू लागले. मात्र ‘एक मुसाफिर एक हसीना’ या चित्रपटातील गाण्यांनी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा ओपींची दखल घ्यायला लागली. यावेळीही त्यांच्याकडे रफीनामक हुकमाचा एक्का होताच. ‘बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी..’, ‘आप युही अगर हमसे मिलते रहे..’, ‘मं प्यार का राही हूं..’, ‘मुझे देखकर आप का मुस्कुराना..’, ‘हमको तुम्हारे इश्कने क्या क्या बना दिया..’ अशी एकापेक्षा एक गाणी यात रफींना मिळाली. ‘नया दौर’नंतर ओपी व दिलीपकुमार यांच्यात वितुष्ट आलं होतं. ‘एक मुसाफिर’च्या वेळी दिलीपकुमार यांच्या ‘गंगा-जमुना’मधील गाणीही गाजत होती. मात्र ओपीची गाणी सरस आहेत, असं जाहीर विधान दिलीपकुमार यांनी तेव्हा केलं. या गाण्यांचा अंमल ओसरतो न ओसरतो तोच धडकली ती ‘फिर वही दिल लाया हूं’ची गाणी. यात तर या जोडीने कहर केलाय. ‘लाखो हैं निगाह में..’, ‘बंदा परवर थामलो जिगर..’, ‘हमदम मेरे खेलना जानो..’, ‘अजी किबला’ ही धुंद गाणी एकीकडे आणि ‘आँचल में सजा लेना कलीयाँ..’ हे विरहगीत दुसरीकडे. किती वैविध्य दिलाय ओपींनी आणि त्यांच्या लाडक्या गायकाने या सर्व रचनांचं सोनं केलं आहे. या सुमारास सर्वच संगीतकारांची पहिली पसंती रफी हीच होती, मात्र त्यांची गाणी अशी रसरशीत नव्हती. ‘गाईड’ मधील ‘तेरे मेरे सपने..’ या गाण्यानंतर सचिनदांनी रफींच्या गोड आणि हळुवार गायकीचं श्रेय स्वत:कडे घेतलं होतं. मात्र त्यापूर्वीच ओपींकडे रफींनी कितीतरी मधाळ गाणी गायली होती, हे कोणी नाकारू शकत नाही. दिलीप, देव व राज यांच्याप्रमाणेच शम्मी कपूरचाही संगीतकार ठरलेला. त्यामुळे टॉपला जाऊनही ओपींना शम्मीचे फार चित्रपट मिळाले नाहीत. तरीही त्यांच्या वाटय़ाला आलेल्या ‘काश्मीर की कली’ने इतिहास घडविला. शम्मी कपूरसाठी शंकर-जयकिशन यांच्याकडे गाताना रफींना शिरा ताणून गावं लागलं. ओपींनी मात्र असं काही दडपण बाळगलं नाही. त्यांच्या प्रत्येक गाण्यात तारुण्यातील अवखळपणा व सळसळ होतीच, त्यामुळे नायक कोण आहे, हा प्रश्न गौण होता. तरीही एस-जेंना खणखणीत उत्तर देण्यासाठी त्यांनी यात हटके संगीत दिलं हेही गाणी ऐकताना जाणवतं. एस-जे आणि शम्मी कपूर जोडीचे अनेक चित्रपट आले, मात्र त्या गाण्यांना ‘काश्मीर की कली’ची सर नाही. ‘किसी ना किसी से..’, ‘ये चाँदसा रोशन चेहरा..’, ‘सुभान अल्ला..’, ‘है दुनिया उसीकी..’ ही एकापेक्षा एक सरस एकलगीते रफींनी गायली तर आजवरच्या सर्वोत्तम १० युगुलगीतांमध्ये ज्याचा समावेश होईल, अशा ‘दिवाना हुआ बादल..’ या गाण्याने कडीच केली. ‘इशारो इशारों में..’ आणि ‘मेरी जाँ बल्ले बल्ले..’ ही युगुलगीतेही धुंद करणारी. रफींनी गायलेल्या एकलगीतांचीही टॉप टेन सूची करायची झाली तर त्यात डोळे मिटून ‘पुकारता चला हूँ मं..’ या गाण्याला जागा द्यावी लागेल. एखाद्या गायकाचा आवाज किती गोड असू शकतो, याची साक्ष ‘मेरे सनम’ मधील या गाण्यात मिळते. ओपींच्या अन्य गाण्यांप्रमाणे हे गाणंही सदाबहार आहे. याशिवाय ‘हमदम मेरे मान भी जाओ..’, ‘हुए है तुमपे आशिक हम..’, ‘टुकडे है मेरे दिलके..’ ही अन्य एकलगीते आणि ‘हमने तो दिलको आपके, रोका कई बार मंने..’ ही युगुलगीतेही चांगलीच जमून आली होती. यानंतरही ‘बहारे फिरभी आएंगी’, ‘ये रात फिर ना आएगी’, ‘मोहब्बत जिंदगी है’ आदी चित्रपटांत ओपी-रफी जोडीने चांगली गाणी दिली. मात्र, हे चित्रपट म्हणजे या जोडीच्या सुरेल पर्वाचा अखेरचा टप्पा ठरले. सचिनदेव बर्मन, मदनमोहन, रोशन आदी संगीतकार मेलडीवर भर देत असताना आणि शंकर-जयकिशन यांचा भलामोठा वाद्यवृंद अन्य संगीतकारांच्या उरात धडकी भरवत असताना ओपींनी सारंगी, संतूर, गिटार, ढोलक अशी मोजकी वाद्ये वापरून आपलं वेगळेपण सिद्ध केलं. हा आत्मविश्वास जपण्यासाठी त्यांना साथ होती ती आशा आणि रफी यांची. संख्येचा विचार केला तर रफी हे ओपींपेक्षा शंकर-जयकिशन यांच्याकडे व त्यापेक्षाही अधिक लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे गायल्येत असं दिसून येईल (‘आराधना’ नंतर लक्ष्मी-प्यारेंमुळेच रफी यांचं अस्तित्व टिकलं, हेही खरं.). मात्र ते मुक्त, मनमुराद, अवखळ, स्वच्छंद कोठे गायले असतील तर ओपींकडेच, बाकी संगीतकारांच्या बाबतीत ‘लेकीन वो बात कहाँ’ असंच म्हणावं लागेल.
ओपी नव्हे शीघ्रकोपी!
कमालीचे वक्तशीर असणाऱ्या ओपींना ध्वनीमुद्रणासाठी कोणीही उशिरा आलेलं खपत नसे. ‘सावन की घटा’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी रफी उशिरा आल्याने ओपी संतापले, शंकर-जयकिशन यांचं ध्वनिमुद्रण लांबल्याने उशीर झाला, या रफींच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी आपल्या लाडक्या गायकाला निघून जाण्यास सांगितलं. रफीला माझ्या वेळेची किंमत नसेल तर मलाही रफी नको, अशी हटवादी भूमिका त्यांनी घेतली, परिणामी ही जोडी फुटली. (त्यामुळे ओपींची अनेक चांगली गाणी महेंद्र कपूरच्या आवाजात ऐकावी लागली.). तीन वर्षांनंतर मनाचा मोठेपणा दाखवत रफी ओपींकडे गेले व झाले गेले विसरून जाऊ म्हणाले. ओपींनाही आपली चूक उमगली होती. दोघं एकमेकांच्या गळ्यात पडले. रफी, मी माझा अहंकार कुरवाळत बसलो, तू मात्र अहंकारावर मात केलीस, तू ग्रेट आहेस, अशा शब्दांत ओपींनी आपल्या आवडत्या गायकाचं कौतुक केलं. मात्र याच सुमारास म्हणजे १९७०च्या सुमारास ओपींची कारकीर्द घसरणीला लागल्याने या जोडीची जादू नव्याने जमली नाही.
तुमसा नही देखा…
हिंदी चित्रपट संगीताच्या त्या सुवर्णकाळात कोणत्याही संगीतकाराचं रफींशिवाय पान हलत नसे. प्रत्येकाची शैली वेगळी होती, सर्वानीच रफींकडून उत्तम गाणी गाऊन घेतली. तरीही ओपींचे वेगळेपण रफी जाणून होते. ओपींचं कौतुक करताना रफी म्हणत, ‘‘यू तो हमने लाख संगीतकार देखे है, तुमसा नही देखा..’’ विशेष म्हणजे हे विधान ते खासगीत नाही तर उघडपणे करत असत, अन्य कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता!

mohammad rafi, bollywood, music, hindi cinema, hindi film, hindi movie, marathi, loksatta, loksatta news, marathi news