सिंधू खोऱ्यातली हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती अत्यंत विशाल आणि संपन्न होती. राहण्यापासून-वागण्यापर्यंत या संस्कृतीतील लोक किती सुसंस्कृत होते याची प्रचीती देणारे अवशेष आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. इतिहासाच्या उदरात शिरून नवे काही सापडण्याचा शोध घेणारे दिग्दर्शक कमी असतात. आशुतोष गोवारीकर हे नाव त्या कमीपैकी एकमेव नाव आहे ज्याने दिग्दर्शक म्हणून हा जॉनर बॉलीवूडमध्ये खेळवला आहे. सिंधू संस्कृतीविषयी असणारी ओढ आणि त्याचा अभ्यास या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तरी भग्न झालेल्या त्या काळाचे जे तुकडे आपल्याकडे आहेत ते जोडून लयाला गेलेल्या एका संस्कृतीची कथा रचणं ही खचितच सोपी गोष्ट नाही. बॉलीवूडमधील सगळी व्यावसायिकतेची गणितं बाजूला ठेवून प्रामाणिकपणे आपल्याला पटलेली गोष्ट मांडण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ‘मोहेंजो दारो’च्या निमित्ताने केला आहे.
‘मोहेंजो दारो’ पाहताना प्रकर्षांने या चित्रपटाची तुलना कशाशी होत असेल तर ती गेल्या वर्षी आलेल्या एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाची.. या दोन्ही चित्रपटांच्या कथांची जातकुळी एकच आहे, मात्र चित्रपटांचा आत्मा पूर्णपणे वेगळा आहे. ‘बाहुबली’ची कथाच मुळी काल्पनिक शहरात घडत असल्याने दिग्दर्शक म्हणून जे स्वातंत्र्य राजामौली यांना घेता आलं आहे ते घेण्याची संधी ‘मोहेंजो दारो’साठी आशुतोषला मिळालेली नाही. मोहेंजो दारोची सिंधू संस्कृती हे वास्तव आहे, मात्र आपल्याला ज्ञात नसलेल्या काळाचं.. त्यामुळे त्या संस्कृतीच्या उरलेल्या खाणाखुणा धुंडाळत काल्पनिकरीत्या तो काळ उभा करणं हेच दिग्दर्शकासमोरचं मोठं आव्हान होतं. ‘मोहेंजो दारो’मध्ये आमरी गावात नीळचं पीक घेणारे शेतकरी दिसतात. सर्मन (हृतिक रोशन) हा त्यांच्यापैकीच एक. आपला काका दुर्जन (नितीश भारद्वाज) आणि काकू (किशोरी शहाणे) यांच्याबरोबर आमरीत वसलेल्या सर्मनला स्वप्न पडतात ‘मोहेंजो दारो’ची.. मोहेंजो दारोत जाण्याची परवानगी अखेर सर्मनला काकाकडून मिळते. मोहेंजो दारोत आलेल्या सर्मनची ओळख चानीशी (पूजा हेगडे) होते. चानीच्या निरागस सौंदर्यात हरवत चाललेल्या सर्मनला मोहेंजो दारोत असलेल्या महमच्या (कबीर बेदी) अमानवी सत्तेचीही ओळख होते. चानीचं प्रेम, महमचा मुलगा मुंजा (अरुणोदय सिंग) याच्याशी चानीचा ठरलेला विवाह आणि हा तिढा सोडवत असताना सर्मनला लक्षात आलेले त्याचे मोहेंजो दारोशी असलेले खरे नाते या सगळ्यातून आशुतोष गोवारीकर यांनी सिंधू सभ्यतेच्या कोंदणातली एक वेगळी कथा सादर केली आहे.
‘मोहेंजो दारो’ करताना त्या काळातील भाषेची, कपडय़ांची समीकरणं दिग्दर्शकाने आपल्या पद्धतीने सोडवली असली तरी एक काल्पनिक सिंधू संस्कृती दिग्दर्शकाने उत्तम उभी केली आहे आणि तेही व्हीएफएक्सचा मर्यादित वापर करत हे या चित्रपटाचं मोठं वैशिष्टय़ म्हटलं पाहिजे. सर्मनचा मोहेंजो दारोत प्रवेश झाल्यानंतर सेपिया टोनचा वापर करत दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने चित्रण केले आहे ते पाहता ‘ग्लॅडिएटर’सारख्या हॉलीवूडपटांची हटकून आठवण येते. या चित्रपटाला एक सुरुवात, मध्य आणि शेवट असले पाहिजे या पद्धतीने दिग्दर्शकाने गोष्टीची मांडणी केली आहे. त्यामुळे हडप्पा ते मोहेंजो दारो असा महमचा झालेला प्रवास, त्यातून उभी राहिलेली त्याची राजवट, सिंधूच्या खोऱ्यात असं काय महमला गवसलं असेल ज्यामुळे व्यापार-उदीमासाठी हे शहर ओळखले गेले या सगळ्या छोटय़ा-मोठय़ा तपशिलांचा वापर करत ‘मोहेंजो दारो’ उभा करण्यात आला आहे. एवढी मोठी संस्कृती का लयाला गेली असेल? महमसारख्या एखाद्या सत्तालोलुप व्यक्तीमुळे मोहेंजो दारोचा झालेला विनाश आपल्याला पाहायला मिळतो. सिंधूचा प्रकोप, त्यात बुडालेली सिंधू संस्कृती आणि गंगेच्या खोऱ्यात विकसित झालेली नवी संस्कृती असा एक मोठा पल्ला दिग्दर्शकाने चित्रपटात गाठला आहे. हृतिक रोशन सर्मन म्हणून चपखल बसला आहे, त्याच्या प्रत्येक गुणाचा फायदा गोवारीकर यांनी सर्मनच्या भूमिकेसाठी करून घेतला आहे. पूजा हेगडे नवोदित असली तरी तिचा सहज वावर तिला दिलेल्या लुकसह तिने योग्य पद्धतीने पुढे नेला आहे. नितीश भारद्वाज, कबीर बेदी, अरुणोदय सिंग, पुजाऱ्याच्या भूमिकेतील मनीष चौधरी अशा प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका योग्य पद्धतीने वठवली आहे. ए. आर. रेहमानच्या संगीताने उरलेली जादू भरून काढली आहे. एक परिपूर्ण नाही पण तरीही काळाचा एक वेगळा तुकडा काल्पनिक कथेच्या माध्यमातून दिग्दर्शकाने सादर केला आहे.
मोहेंजो दारो
निर्मिती – सिद्धार्थ रॉय कपूर , सुनीता गोवारीकर
दिग्दर्शक – आशुतोष गोवारीकर
कलाकार – हृतिक रोशन, पूजा हेगडे, कबीर बेदी, नितीश भारद्वाज, किशोरी शहाणे, अरुणोदय सिंग, मनीष चौधरी, सुहासिनी मुळ्ये.