बॉलिवूडची ‘मिस हवाहवाई’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मॉम’ या चित्रपटातून श्रीदेवी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने ती विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देत आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये श्रीदेवीने तिच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या नात्याच्या बंधांविषयी सांगितलं.

दोन मुलींची आई असणारी ही अभिनेत्री तिच्या मुलींच्या भावी आयुष्याविषयीसुद्धा सजग आहे. या मुलाखतीत तिच्या बोलण्यावरुनच ते व्यक्त होत होतं. यावेळी तिने जान्हवीच्या भावी पतीबद्दल काय अपेक्षा आहेत यावरुनही पडदा उचलला. जान्हवीला अगदी तिच्या बाबांप्रमाणे म्हणजेच बोनी कपूर यांच्याप्रमाणेच जोडीदार हवा आहे. याविषयीच सांगताना श्रीदेवी म्हणाली, ‘माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर बोनीजींनी माझ्या वडिलांची, आईची आणि पतीची भूमिका साकारली. आमच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, आजही माझ्याविषयी मत मांडताना त्यांच्या डोळ्यात एक चमक पाहायला मिळते. जान्हवीच्या मते आमचं हे नातं पाहता तिला असा आनंद कुठेच मिळत नाही. तिला अगदी तिच्या बाबांसारखाच जोडीदार हवा आहे. ही खरंच सुरेख बाब आहे नाही का?’ जान्हवीच्या भावी पतीविषयी असणाऱ्या अपेक्षा आणि शाहिदच्या भावासोबतचं म्हणजेच इशान खत्तरसोबतचं नातं पाहता आता तो या चौकटीत बसतो का, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

वाचा : Tubelight Review : …अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली रेssss!

श्रीदेवीला नेहमीच तिच्या मुलींच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी विचारलं जातं. त्यातही जान्हवीचं नाव बरंच चर्चेत असतं. त्याविषयी मत मांडत ती म्हणाली, ‘हे क्षेत्र वाईट आहे असे मला वाटत नाही. या सृष्टीनेच मला घडवलंय. पण, एक आई म्हणून मला तिचं लग्न झालेलं पाहण्यास जास्त आवडेल. मात्र तिचा आनंदही जास्त महत्त्वाचा आहे. तिने एक अभिनेत्री म्हणून नाव कमावलं तर मला अभिमानच होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुचर्चित ‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवीसोबतच सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना या कलाकारांच्यासुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. सावत्र आई आणि मुलीच्या नात्यावर या चित्रपटातून भाष्य केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’ श्रीदेवीचा ३०० वा चित्रपट असून, ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.