दसरा आणि दिवाळी हे दोन सण खरंतर हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी महत्त्वाचे मानले जातात. नामांकित कलाकारांचे मोठे चित्रपट दिवाळी आणि त्याला जोडून असलेल्या सुट्ट्यांच्या दिवसात प्रदर्शित केले जातात. यंदा मात्र हिंदीऐवजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या अधिक आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा हिंदीतला मोठा चित्रपट आणि ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर थेट दिवाळीत मॅडॉक फिल्म्सचा ‘थामा’ हा एकमेव चित्रपट वगळता हिंदीत फारसे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, मात्र पुढच्या दोन महिन्यांत १५ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
ऑक्टोबरची सुरुवात हिंदी आणि दाक्षिणात्य मोठ्या चित्रपटाने होणार असली तरी त्यानंतर मात्र नोव्हेंबरपर्यंत मोजून सहा ते सात हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात उल्लेखनीय म्हणता येतील असे आयुष्मान खुराणा, रश्मिका मंदाना, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिका असलेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’, फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेला ‘१२० बहादूर’ आणि अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा सीक्वेलपट हे तीनच चित्रपट आहेत. त्या तुलनेत मराठीत ऑक्टोबरमध्ये पाच तर नोव्हेंबरमध्ये दहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी अनेकदा एकाच आठवड्यात पाच ते सहा मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले आहेत.
अनेक मोठे मराठी चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाल्याने साहजिकच त्यांचा एकमेकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. या महिन्यातही १९ सप्टेंबरला एकाच आठवड्यात जवळपास सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. यातही सिध्दार्थ जाधव, मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, वैभव मांगले, वीणा जामकर, साईंकित कामत, प्रल्हाद कुडतरकर, हार्दिक जोशी अशा नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांचा जसा समावेश होता तसेच सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवल्या गेलेल्या रोहन कानवडे दिग्दर्शित ‘सांबर बोंडं’ या चित्रपटाचाही समावेश आहे.
शिवाय, त्याआधीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ला चांगला प्रतिसाद लाभल्याने हाही चित्रपट अजून चित्रपटगृहात आपले खेळ टिकवून आहे. या महिन्याभरात ‘दशावतार’ या एकमेव चित्रपटाने जवळपास १८ कोटींच्या आसपास कमाई करत घवघवीत यश मिळवले आहे.
आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही मराठी चित्रपटांची एकाच दिवशी प्रदर्शनासाठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसाद ओक अभिनीत, दिग्दर्शित ‘वडापाव’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ आणि सुबोध भावे – मानसी नाईक जोडीचा ‘सकाळ तर होऊ द्या’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
दिवाळीत ‘प्रेमाची गोष्ट २’ हा सिक्वेलपट तर ऑक्टोबरच्या शेवटी ‘रीलस्टार’ बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नोव्हेंबरमध्येही ‘अभंग तुकाराम’, ‘कढीपत्ता’ हे पहिल्या आठवड्यात, ‘उत’, ‘वेल डन आई’, ‘खुळ्यांची जत्रा’ आणि ‘पुन्हा साडे माडे तीन’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतरच्या दोन्ही आठवड्यांत ‘असंभव’, ‘लास्ट स्टॉप खांदा’, ‘स्मार्ट सूनबाई’ आणि ‘देवघर ऑन रेंट’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकूणच हिंदीपेक्षा पुढच्या दोन महिन्यांत मराठी चित्रपटच अधिक चर्चेत राहणार आहेत.