जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी सुटकेची मोहीम भारताच्या नावावर नोंदली गेली आहे. १९९० साली गल्फ युद्धाच्या वेळी १ लाख ७० हजार भारतीयांची कु वेतमधून सुटका करण्यात आली. कोणत्याही सहज मदतीविना केवळ माणुसकीच्या भावनेतून केलेल्या या मोहिमेची यशस्वी दास्ताँ सांगताना देश, मायभूमी, तिरंग्याचा अभिमान या एरव्ही जाणिवेच्या पातळीवर असणाऱ्या भावना नेणिवेत उतरतानाचा क्षण दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन याने ‘एअरलिफ्ट’मध्ये खासा पकडला आहे.

‘एअरलिफ्ट’ हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, हे सुरुवातीलाच स्पष्ट होते. नोकरीधंद्याच्या निमित्ताने कुवेतमध्ये स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांसाठी तिथल्या यशस्वी आणि सुखासीन आयुष्यामुळे त्यांची भारतीय नागरिक ही ओळखच पुसली गेली होती. आपण कुवेती असल्याच्या थाटातच ते वावरू लागले होते. नेमक्या त्याच वेळी सद्दाम हुसैन यांची इराकी सेना थेट कुवेत शहरात घुसली. इराकी सेनेला अमेरिका लवकरच नेस्तनाबूत करेल आणि आपल्यावरचे संकट टळेल अशा भ्रमात असलेल्या या नागरिकांना सुटकेसाठी अखेर मायदेशाचाच आधार घ्यावा लागला, ही घटना इतिहासात नोंदली गेली आहे. मात्र कुवेतमधून सगळे सोडून जीव मुठीत धरून मायदेशाचा रस्ता धरताना व्यक्ती ते स्वदेश ही बदलत गेलेली जाणीवही तितकीच महत्त्वाची होती. इथे ही जाणीव रणजित क टियाल (अक्षय कुमार) नामक उद्योजकाच्या नजरेतून आपल्याला पाहायला मिळते.

पहिल्यांदा आपले छोटेसे घरटे वाचवण्यासाठी निघालेल्या रणजितला आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच अनेक भारतीय इथे अडकले आहेत, याची पहिल्यांदाच जाणीव होते. कुवेतमधून बाहेर पडण्यासाठी खुद्द इराकची, अमेरिकेची मदत घेण्याचा प्रयत्न होतो. केवळ कुवेती नाहीत म्हणून इराकी सैन्यापासून जीव वाचवण्यासाठी आपली भारतीय हीच ओळख त्यांच्या कामी येते. पण भारतात परतणे त्यांच्यासाठी दुरापास्त होऊन बसते. तरीही भारतीय म्हणून एकत्र राहिलो तरच बाहेर पडू शकू  या विचाराने हे १ लाख ७० हजार नागरिक एका कॅ म्पमध्ये एकत्र येतात. ‘भारताला तरी का दोष द्या.. दहा दिवसांपूर्वी आपल्यासाठी ही ओळख तितकी महत्त्वाची नव्हती’, अशा थेट संवादातून दिग्दर्शक या घटनेमागचे पडसाद आपल्याला जाणवून देतो. या अर्थाने ती केवळ कुवेतमधून सुटका नाही. तर एका सामान्य माणसाने आपल्याच दीड लाखांहून जास्त बांधवांच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न, दूर दिल्लीत शासकीय कार्यालयात नेहमीची कारकुनी कामे करत बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सतत कुवेतवरून येणाऱ्या एका दूरध्वनीच्या आधारे माणुसकीच्या भावनेतून मंत्र्यांपर्यंत हलवलेले प्रशासन आणि ‘एअर इंडिया’च्या वैमानिकांनी युद्धजन्य परिस्थितीत ४८८ वेळा हवाई उड्डाणे करून दीड लाख भारतीयांना परत आणण्याची केलेली विक्रमी कामगिरी हा पूर्ण घटनाक्रम चित्रपटात त्यात गुंतलेल्यांच्या भावभावनांसह आपल्यासमोर उलगडत जातो.

दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी अत्यंत संयत पद्धतीने हा विषय हाताळला आहे.

कब्जा केलेल्या देशात सैनिकांची अंदाधुंद, अविचारी निर्णयांचे फटके या सगळ्या गोष्टी मांडताना कुठेही मूळ विषय भरकटणार नाही,  याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. हा चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या आजवरच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम चित्रपट आहे, यात शंका नाही. अक्षयने ‘हरी ओम एंटरटेन्मेट’ या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे अक्षय खरोखरच रणजीत कटियालची भूमिका जगला आहे. रणजीतच्या करारी पत्नीच्या भूमिकेत निम्रत कौर भाव खाऊ न गेली आहे. छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखांसाठीही चांगल्या कलाकारांची निवड ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. पूरब कोहली, प्रशासकीय अधिकारी संजीव कौल यांच्या भूमिकेतील कुमूद मिश्रा, पुन्हा एकदा अवतार गिल असे अनेक ओळखीचे तरीही वेगळे चेहरे चित्रपटात पाहायला मिळतात. १९९० सालचे कुवेत दाखवण्यासाठी सेट तयार करून चित्रीकरण केले असले तरी ते अस्सल वाटते. ‘एअरलिफ्ट’ हा देखणा चित्रपट नाही किंबहुना विषयाशी प्रामाणिक राहून चित्रपटाची सरळ मांडणी करण्यात आली आहे. मात्र पटकथा आणि संवादांमध्ये चित्रपट अर्धी बाजी मारतो. विषयाचे भान राखत एक-दोन गाणी वगळता बाकी पाश्र्वसंगीत म्हणूनच कानावर पडतात.

अमाल मलिक आणि अंकित तिवारी या जोडीने दिलेली गाणीही श्रवणीय आहे. एकूणच पटकथेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंत सरस ठरलेला हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्रदर्शित झालेला चांगला देशभक्तीपट आहे.

एअरलिफ्ट

दिग्दर्शक – राजा कृष्णा मेनन

पटकथा  – राजा कृष्णा मेनन, सुरेश नायर

राहुल नांगिया ,  रितेश शाह

संगीत- अमाल मलिक, अंकित तिवारी

सिनेमॅटोग्राफी- प्रियल सेठ

संकलन-  हेमांती सरकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार – अक्षय कुमार, नीम्रत कौर, पुरब कोहली, कुमुद मिश्रा