बंगाली समाजामध्ये दुर्गापूजेचे मोठे महत्त्व आहे. षष्ठीपासून उत्सवाला प्रारंभ होतो. षष्ठीला प्रतिष्ठापना होते. त्यानंतर सप्तमीपासून इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. या उत्सवासाठी अनेकठिकाणी कोलकाताहून खास ढोलवादकांना निमंत्रित करण्यात येते. त्यांना ढाकी म्हणतात. हे ढाक म्हणजे ढोल केवळ पूजेच्या वेळी वाजवतात, ते इतर कोणत्याही कार्यक्रमात वाजवत नाहीत. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी पती निखिल जैनसोबत ढाक वाजवून दुर्गापूजा केली.

ढाकच्या वादनाने दुर्गादेवी प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देते असं म्हटलं जातं. या व्हिडीओत नुसरत जहाँ व त्यांचे पती निखिल हे पारंपरिक वेशभूषेत ढाकवादनाचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळी धुनूची नृत्य आणि शंख फुंकण्याची स्पर्धाही घेण्यात येते.

अभिनेत्री नुसरत जहाँ या पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचल्या. कोलकात्याचे पत्रकार निखिल जैन यांच्याशी त्यांनी टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत नेहमीच चर्चेत असतात.