तरुणाई आणि रिअॅलिटी शो हे एक धम्माल समीकरण झाले आहे. काही रिअॅलिटी शो प्रेक्षकांमध्ये विशेष गाजतात. अशाच काही कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘स्प्लिट्सव्हिला’. या कार्यक्रमाच्या ९ व्या पर्वाची सांगता नुकतीच करण्यात आली. यंदाच्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या जोड्यांपैकी काव्या खुराना आणि गुरमीत रेहाल यांची जोडी ‘अल्टीमेट किंग-क्वीन’ झाले आहेत.

विविध अडथळे पार करत काव्या आणि गुरमीत यांच्या वाट्याला हे विजेतेपद आले आहे. ‘कवमीत’ म्हणून ओळखल्या या जोडीला आधीपासूनच प्रेक्षकांची पसंती होती. हे विजेपद मिळवल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना गुरमीतने त्याचा आनंद व्यक्त केला आहे. ‘मला असं वाटतं की, आतापर्यंत मी बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालो आहे. ‘रोडिज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ नंतर कोणत्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर मी आता काय करु हे मला कळत नाही. त्यामुळे सध्या मी कोणतेही रिअॅलिटी शो करण्याच्या विचारात नाही’, असे गुरमीत म्हणाला.

रिअॅलिटी शो नंतर सध्या गुरमीत चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावू पाहात आहे. ‘माझ्यातील अभिनय कौशल्याचा योग्य वापर होईल अशाच चित्रपटांमध्ये मला काम करायला आवडेल. मला नाच-गाण्याचे चित्रपट करायची इच्छा नाही’, असे गुरमीत म्हणाला. यावेळी त्याने काव्या आणि त्याच्या नात्याविषयीसुद्धा बोलण्यास प्राधान्य दिले. ‘आमचे नाते अगदी सहज आणि नैसर्गिकपणे पुढे गेले आहे. आमच्यात काही मतभेदही होते जे आम्ही योग्य वेळी दूर केले आहेत’, असे तो म्हणाला.

गुरमीत त्याला मिळालेल्या यशाविषयी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असतानाच काव्यानेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. गुरमीतविषयी बोलताना ‘मी आतापर्यंत भेटलेल्यांपैकी गुरमीत हा सर्वात छान व्यक्ती आहे’, असे काव्या म्हणाली. काव्यासुद्धा ‘रोडिज’मधील एक स्पर्धक होती. पण अल्टीमेट क्वीन म्हणवणाऱ्या काव्याने बी टाऊनमध्ये काम करण्यात फारसे स्वारस्य दाखवले नाही. रिअॅलिटी शो आणि त्यातून प्रसिद्धीस नेणाऱ्या वादांमुळे चर्चेत येणारे कलाकार पाहता काव्या आणि गुरमीतची ही जोडी किती काळ टिकणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.