बॉलीवूड इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी आली आहे. खरं तर, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर. राजकुमार’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. २३ मे रोजी रात्री या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. खूप कमी लोकांना माहीत असेल की, अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारे मुकुल देव एकेकाळी पायलट होते. चला जाणून घेऊ ते चित्रपटांमध्ये कसे आले?
कमर्शियल पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले होते
मुकुल देव हे टीव्ही व बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमधून काम केले होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अभिनेता होण्यापूर्वी ते पायलट होते. त्यांनी कमर्शियल पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले होते. पण, सुरुवातीपासूनच त्यांना अभिनयात रस होता. म्हणूनच ते ग्लॅमरस जगाकडे वळले .
मुकुल देव यांनी हिंदी चित्रपट, टीव्ही शो व संगीत अल्बममध्ये काम करून खूप प्रसिद्धी मिळवली. मुकुल देव यांचे नाव अशा कलाकारांमध्ये गणले जाते की, ज्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत स्वतःला सिद्ध केले.
अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘या’ शोपासून झाली
मुकुल देव यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या टीव्ही मालिकेने झाली. त्यानंतर ते दूरदर्शनच्या ‘एक से बढ़कर एक’ या कॉमेडी शोमध्ये दिसले आणि छोट्या पडद्यावर एक खास ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘कहानी घर घर की’ यांसह अनेक मालिकांमधून काम केले.
टीव्हीमधील प्रसिद्धीनंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण
टीव्हीमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर मुकुल यांनी सुश्मिता सेनबरोबर ‘दस्तक’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. या चित्रपटात त्यांनी एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ व ‘आर. राजकुमार’ यांसारख्या चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. मुकुल यांनी ‘फियर फॅक्टर इंडिया’ सीझन १ चे सूत्रसंचालनही केले होते.