मागील काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळतोय. दाक्षिणात्य कलाकार व त्यांच्या चित्रपटांना उत्तरेकडे खूप पसंती मिळते. काही दाक्षिणात्य चित्रपट तर रेकॉर्डब्रेक कमाई करतात इतका चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो. असाच एक चित्रपट १९ वर्षांपूर्वी आला होता.

कोणताही मोठा चित्रपट रिलीज झाला की तो एक किंवा दीड महिन्यात थिएटरमधून हटवला जातो. पण या चित्रपटाने तब्बल ४६० दिवस बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. या चित्रपटाने बजेटपेक्षा तब्बल १०७ पट जास्त कमाई केली होती.

हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन योगराज भट्टने केलं होतं. या चित्रपटाचं नाव ‘मुंगारू माले’. हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट होता आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यात गणेश आणि पूजा गांधी यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. अनंत नाग देखील या सिनेमात होते. ७० लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला ‘मुंगारू माले’ हा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला होता.

गोल्डन जुबली चित्रपट

‘मुंगारू माले’ मल्टीप्लेक्समध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ चालला होता. बंगळुरूतील पीव्हीआरमध्ये या सिनेमाचा ४६० दिवस जलवा होता.
‘मुंगारू माले’ हा जगभरात ५० कोटींचा व्यवसाय करणारा पहिला कन्नड चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन ७५ कोटी रुपये होते.

‘मुंगारू माले’च्या निर्मात्याच्या घरावर छापेमारी

‘मुंगारू माले’ चित्रपट प्रदर्शित होताच पूजा आणि गणेश दोघेही रातोरात स्टार बनले. नंतर त्यांनी इंडस्ट्रीत खूप काम केलं आणि अनेक हिट चित्रपट दिले. आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार ठरले. पण या चित्रपटाचे निर्माते ई कृष्णा यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

आयकर विभागाच्या मते, चित्रपटाने ६७.५० रुपयांची कमाई केल्याने त्यावर कर भरावा लागेल. यासाठीच निर्मात्याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. दरम्यान, ‘मुंगारू माले’चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड एका दशकाहून अधिक काळ अबाधित राहिला होता. हा रेकॉर्ड यशचा केजीएफ चॅप्टर १ने मोडला.