संगीत क्षेत्रावर केवळ मुंबई-पुण्याचीच मक्तेदारी आहे, असा काहींचा समज आहे, मात्र सोलापूरच्या एका दुष्काळग्रस्त गावातील व शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने सुरांचा मळा फुलवून हा समज खोटा ठरविला आहे. लक्ष्मण नाईकवाडी या जिद्दी तरुणाची ही कथा.
रोजच्या धकाधकीच्या जगण्यात मनाची शांती गमावून बसलेल्या माणसाला नवी उमेद देण्याचं बळ कशात असेल, तर ते गाण्यात! कोणतंही चांगलं संगीत ऐकलं की कोणालाही प्रसन्न वाटतं. एवढी किमया ज्या संगीतात आहे, ते केवळ श्रवणापुरतं मर्यादित न राहाता तुम्हाला त्यात गती असेल तर आणखी चांगलं. तुमच्या अनेक समस्या त्यामुळे सुटू शकतात. सोलापूर जिल्ह्य़ाच्या दुष्काळग्रस्त भागातील एका शेतकऱ्याच्या मुलाला सध्या हा अनुभव येत आहे.
या जिल्ह्य़ातील उपळे (दुमाला) या भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या दुष्काळामुळे केवळ शेतीवर अवलंबून राहणे अशक्यच. यावर उतारा म्हणून लक्ष्मणने चक्क गाण्यांचा आसरा घेतला. कोठेही शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेल्या लक्ष्मणला लहानपणापासून गाण्यांची प्रचंड आवड. रेडिओ-टीव्हीवर अनेक कलाकारांची गाणी ऐकत त्याने आपली एकलव्यी साधना सुरू ठेवली. याचाच परिपाक म्हणजे ‘हर पल तेराही नशा है’ हा त्याचा नवा अल्बम. दुर्गम भागातील एका तरुणाने थेट हिंदी गाण्यांचा अल्बम काढावा, यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अर्थात, हा काही त्याचा पहिला अल्बम नव्हे. यापूर्वी ‘फाऊंटन’ या नामांकित कंपनीने त्याचा ‘मन वारा’ हा अल्बम प्रकाशित केला आहे. त्यापाठोपाठ आलेला ‘हर पल तेराही नशा है’ हा अल्बम मुंबईतील ‘यलो अँड रेड’ या कंपनीने प्रस्तुत केला आहे आणि तो (ँं१ स्र्ं’ ३ी१ं ँ्र ल्लं२ँं ँं्र या नावाने)ऑनलाइनही उपलब्ध आहे.
या अल्बममध्ये गीतकार-संगीतकार व गायक अशा तीनही आघाडय़ा लक्ष्मणने समर्थपणे सांभाळल्या आहेत. यात एकूण आठ गाणी असून ‘आंखों में हो तुमही तुम’ या गाण्याने अल्बमची सुरु वात होते. बॉल डान्सला अनुकूल अशी या गाण्याची चाल आहे. ‘दिल ये तुमको चाहे कितना’ या गाण्यातही प्रेमातील हळुवार भावना उत्तम प्रकारे व्यक्त झाली आहे. ‘वो मुस्कुराना’, ‘आजकल मुझको ये क्या हो रहा है’, ‘हरपल तेराही नशा है’, ‘तुझे ना देखू ना तो’, ‘तेरेबिना जी रहा हू ऐसे’ आणि ‘ये इश्क है क्या मै समझ गया’ ही अन्य गाणीही उत्तम आहेत. प्रेमासाठी आतुर असलेल्या एका तरु णाचा प्रवास, त्याच्या मनाच्या निरनिराळ्या अवस्था, आशा-निराशा आदी भावनांचे वर्णन या सर्व गाण्यांमध्ये झालेले आढळते.
लक्ष्मणच्या गायकीवर कुमार शानूचा आणि चालींवर नदीम-श्रवण यांचा प्रभाव असल्याचं जाणवतं. त्यामुळे ही गाणी ऐकताना १९९० च्या दशकात आलेल्या गाण्यांचा काळ सहज आठवतो. सुरु वातीच्या काळात असा प्रभाव असण्यात गैर काहीच नाही. मात्र त्यातून बाहेर पडून कलाकाराने आपला आतला आवाज शोधण्याची गरज असते. लक्ष्मणला तसे मार्गदर्शन मिळाल्यास व त्याने स्वरसाधना केल्यास तो हा टप्पा नक्की पार करेल.
समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचं सत्र अजूनही थांबलेलं नाही, त्या पाश्र्वभूमीवर लक्ष्मणसारख्या कलाकारांची ही धडपड कौतुकास्पद आहे. शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता काही तरी वेगळी वाट चोखाळण्याची गरज आता निर्माण झाली आहे. एक स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मण याच वाटेवरून निघाला आहे. या एकलव्याला कोणी तरी द्रोणाचार्य भेटावेत, ही सदिच्छा.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
एक एकलव्य असाही…
संगीत क्षेत्रावर केवळ मुंबई-पुण्याचीच मक्तेदारी आहे, असा काहींचा समज आहे, मात्र सोलापूरच्या एका दुष्काळग्रस्त गावातील व शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने सुरांचा मळा फुलवून हा समज खोटा ठरविला आहे.
First published on: 30-08-2013 at 03:32 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसंगीतMusicहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music lover laxman naikwadi