हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश करणारे अनेक नवोदित कलांवत विविध कला सादर करत असतात. नच बलिए या प्रख्यात रिअॅलिटी शो मध्ये अशाच दोन कलावंताना संधी मिळाली. पण सरावादरम्यान केलेली एक मिमिक्री त्यांच्या चांगलीच अंगलट आली. कारण याच मिमिक्रीचा आधार घेत एका व्यक्तीने त्यांना ब्लॅकमेल करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मग या खंडणीखोऱ्याच्या मुसक्या आवळल्या.
करण पटेल आणि ऋत्विक धनजानी हे दोन तरुण कलावंत बालाजी टेलिफिल्मच्या नच बलिए या रिअॅलिटी शो मधील स्पर्धक आहेत. एकदा चित्रिकरणानंतरचा सराव संपल्यानंतर त्यांनी मिमिक्री केली. ही मिमिक्री राष्ट्रपुरूषांबाबत होती. पण सेटवरील कुणीतरी त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले आणि विरार मधील अमित वारिक याला दिले. अमितने मग या दोन्ही कलावंतांना धमकवायला सुरवात केली. तुम्ही राष्ट्रपुरूषांची बदनामी केली असून तुमच्या विरोधात तक्रार करेन, अशी धमकी दिली. तसेच ही चित्रफित सोशल मिडियावर टाकली तर तुमची सिनेसृष्टीतील कारकिर्द संपुष्टात येईल अशी भीती घातली. हे जर नको असेल तर २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे तो धमकावू लागले. अशा पद्धतीने काही होईल याची कल्पना नसलेले हे दोन्ही कलावंत घाबरले. त्यांनी आपले मित्र आणि स्मार्ड या स्वयंसेवी संस्थेचे संचालक करण सिंग प्रिन्स यांची भेट घेतली. करणने सुरवातीला अमित वारिक याला समजावून पाहिले. दोन्ही कलावंतांनी माफी मागितली पण वारिक २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अडून बसला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. अखेर करण सिंग प्रिन्स याने या कलावंतांना घेऊन आरे सब पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.
आरे पोलिसांबरोबर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स, पोलीस निरीक्षक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाटकर, सुर्वे आदींच्या पथकाने सापळा लावला. आरोपी वारीक याला खंडणीच्या रकमेतील पहिला १५ लाखांचा हप्ता घेण्यासाठी ओशिवरा बस स्थानकाजवळ बोलावले. तेथे त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपी विरोधात यापूर्वी फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2015 रोजी प्रकाशित
२५ लाखांची मिमिक्री
हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश करणारे अनेक नवोदित कलांवत विविध कला सादर करत असतात. नच बलिए या प्रख्यात रिअॅलिटी शो मध्ये अशाच दोन कलावंताना संधी मिळाली

First published on: 25-07-2015 at 08:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nach baliye contestant give 25 lakh rupees extortion due to mimicry