प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू हा अभिनेता एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. महेश बाबूच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

एसएस राजामौली दिग्दर्शित आणि महेश बाबू व प्रियांका चोप्राची महत्त्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटात नाना पाटेकरही असणार होते. पण त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, राजामौलींनी महेश बाबूच्या वडिलांच्या भूमिकेसाठी नाना पाटेकरांचं नाव विचारात घेतलं होतं. चित्रपटाबद्दल आणि भूमिकेबद्दल सांगण्यासाठी स्वत: राजामौली नाना पाटेकरांना भेटायलाही गेले होते.

राजामौलींनी नानांना संहिताही सांगितली होती आणि नानांना या चित्रपटासाठी २० कोटींचं मानधन ऑफर करण्यात आलं होतं. मात्र, नानांनी राजामौलींच्या चित्रपटाची ही ऑफर नाकारली आहे. ‘मॅशेबल इंडिया’च्या वृत्तानुसार, राजामौलींनी ऑफर केलेल्या भूमिकेत वेगळं काही करण्यासारखं नसल्याने त्यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली.

राजामौली यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटातून नाना पाटेकरांनी एक्झिट घेतली असली, तरी त्यांनी भविष्यात या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजामौलींच्या ‘SSMB29’च्या चित्रीकरणाला जानेवारी महिन्यात सुरूवात झाली आहे. प्रियांकाने महेश बाबूबरोबर हैदराबादमध्ये काही दृश्यांचं चित्रीकरण केलं होतं. तर ओडिसामध्येही काही दृश्ये चित्रीत झाली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘SSMB29’ या चित्रपटाचे बजेट सुमारे १००० कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच, २५ मार्च २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.