मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल कोल्हे यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुखापत झाल्याची घटना समोर आली होती. ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाच्या कराडमधील प्रयोगादरम्यान कोल्हेंना ही दुखापत झाली होती. आता अमोल कोल्हेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

अमोल कोल्हेंनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ते एका रुग्णालयात विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातावर सलाईन लावण्यात आली आहे. अमोल कोल्हे हे ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आणखी वाचा : अमोल कोल्हेंना दुखापत! घोड्याचा पाय दुमडला अन्…; ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं?

हा फोटो शेअर करताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे. “काळजी करण्याचं काही कारण नाही!!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही, लवकरच भेटू ” ११ मे ते १६ मे” हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!!! खूप खूप धन्यवाद”, असे कॅप्शन अमोल कोल्हेंनी या व्हिडीओला दिले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कराडमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना अमोल कोल्हेंना दुखापत झाली. घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला गेल्याने कोल्हेंच्या पाठीत कळ आली. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना लगेचच घोड्यावरुन उतरविण्यात आले. अशा परिस्थितीतही अमोल कोल्हेंनी प्राथमिक उपचार व औषधे घेऊन प्रयोग सुरूच ठेवला. प्रयोग संपल्यानंतर कोल्हेंनी प्रेक्षकांना त्यांच्या दुखापतीबाबत सांगितलं होतं.

आणखी वाचा : Video : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज सूट होणार नाही, कारण…” अमोल कोल्हेंनी सांगितला ‘तो’ कटू प्रसंग

अमोल कोल्हेंना दुखापत झाल्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाचे कराडमधील पुढचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. “या नाटकाचा १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेला प्रयोग हा कराडमधील शेवटचा प्रयोग असेल”, अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली आहे. “दुखापतीवर योग्य ते उपचार घेऊन ११ मेपासून पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा प्रयोग सादर केले जातील”, असंही अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हेंना दुखापत झाल्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाचे कराडमधील पुढचे प्रयोग रद्द करण्यात आले होते.