२०१८ मध्ये एमसीयू म्हणजेच मार्व्हल सिनेमॅटीक यूनिव्हर्सचा ‘ब्लॅक पॅन्थर’ (Black Panther) हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये मध्यवर्ती पात्र असलेला ब्लॅक पॅन्थर हा सुपरहिरो मार्व्हल कॉमिक्समधला पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता चॅडविक बोसमनने (Chadwick Boseman) प्रमुख भूमिका साकारली होती. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे तोंड भरुन कौतुक केले होते. या चित्रपटामुळे पाश्चिमात्य देशामध्ये राहणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांना प्रेरणा मिळाली होती.
‘कॅप्टन अमेरिका: सिव्हील वॉर’ (Captain America: Civil War) या चित्रपटामध्ये ब्लॅक पॅन्थरची पहिली झलक दिसली होती. त्यानंतर हा सुपरहिरो ‘मार्व्हल्स अव्हेंन्जर्स: इन्फिनिटी वॉर’ (Avengers: Infinity War) आणि ‘मार्व्हल्स अव्हेंन्जर्स: एन्डगेम’ (Avengers: Endgame) या चित्रपटामध्येही झळकला होता. त्याचे चाहते ब्लॅक पॅन्थरच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. याच सुमारास कर्करोगाने चॅडविक बोसमनचे निधन झाले. यामुळे ‘ब्लॅक पॅन्थर २’ च्या निर्मितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण मार्व्हलने काही मोठे निर्णय घेत हा चित्रपट तयार केला. पुढच्या महिन्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक कमावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या एका व्हायरल व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये तो धावत भाला फेकत असल्याचे दिसत आहे. त्याच्या आजूबाजूचा अॅम्बियन्स हुबेहूब ब्लॅक पॅन्थर चित्रपटासारखा आहे. तसेच बॅकग्राऊंडमध्ये ‘जे दुसऱ्यांना दुबळे समजतात.. ते स्वत: दुबळे असतात. आज त्यांना आपण कोण आहोत हे दाखवून देऊ’ अशी ऑडिओ क्लिप जोडलेली आहे. व्हिडीओमार्फत त्याने चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.
या व्हिडीओला नीरजने “खेळ असो वा लढाई, जिंकणार तोच ज्याचा निशाणा असेल अचूक; कधी देशासाठी, तर कधी स्वत:साठी… यावेळी मी भाला उचललाय ब्लॅक पॅन्थरसाठी” असे कॅप्शन दिले आहे. पुढे त्यामध्ये प्रेक्षकांना ब्लॅक पॅन्थर २ पाहायला जाण्याचे आवाहन केले आहे. ‘ब्लॅक पॅन्थर २/ ब्लॅक पॅन्थर वंकाडा फॉरेव्हर’ (Black Panther: Wakanda Forever) हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे.