गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. या चर्चा तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. काल ५ जानेवारी रोजी अखेर नेहा लग्न बंधनात अडकली. नेहाने प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगशी लग्न केले. या लग्नसोहळ्याला नेहाने जवळच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले होते. सध्या तिच्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने.
प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. नेहा देखील तिच्या लग्नात गंमतीशीर उखाणा घेतला आहे. ‘चांदीच्या ताटात फणसाचे गरे.. शार्दुलराव आहेत बरे… पण वागतील तेव्हा खरे’ असा तिने उखाणा घेतला आहे. तिचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ तेथे उपस्थित असलेला अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने ‘नवरीचा उखाणा’ असे कॅप्शन दिले आहे.
नेहाचा लग्नसोहळा पुण्यात पार पडलाआहे. लग्नात नेहाने नऊवारी साडी नेसली होती. या नऊवारी साडीमध्ये नेहाचा मराठमोळा लूक पाहण्यासारखा आहे. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तसेच फोटोंमध्ये नेहाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या लग्नाआधीच्या विधिंचे फोटो शेअर केले होते.