सोमवारी जन्माष्टमीच्या दिवशी एक दोन नाही तर, तब्बल सात नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना निवडीचे पुरेपूर स्वातंत्र्य मिळणार आहे. 
केबीसीसोबत स्पर्धा प्राइमटाइमसाठी.
१७ ऑगस्टला, रविवारी सुरतला झालेल्या ग्रॅण्ड प्रीमियर प्रक्षेपणानंतर १८ ऑगस्टपासून अमिताभ बच्चन आणि ‘कौन बनेगा करोडपती’ची ‘हॉटसीट’ रात्री ८.३०ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे केबीसीचे आठवे पर्व असून यावेळी पहिलाच स्पर्धक कपील शर्मा असल्यामुळे सामान्यज्ञान आणि विनोद या दोहोंची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येईल. या आठवडय़ात ‘सोनी’वरील ‘मैं ना भुलूंगी’ आणि ‘एन्टरटेंमेंट के लिए कुछ भी करेगा’ प्रेक्षकांची रजा घेत असून, ‘एक नयी पेहचान’ ही मालिका ८.३० ऐवजी ८ वाजता दाखवण्यात येणार आहे.

या आठवडय़ात ‘स्टार प्लस’ वरील ‘महाभारत’ही संपत असून त्याजागी ‘निशा और उसके कझिन्स’ ही तरुणाई केंद्रस्थानी असलेली हलकीफुलकी मालिका येत आहे. ‘कलर्स’वरील ‘मधुबाला’ सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत असून तिच्या जागी येणाऱ्या ‘उडाण’मध्ये ग्रामीण भागातील वेठबिगारीची प्रथा आणि यातून बाहेर पडण्यासाठी एक लहान मुलीची धडपड याचे चित्रण आहे.

प्रशांत दामले/ कविता लाड हिंदीमध्ये
प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या हिंदीतील पदापर्णामुळे सध्या चर्चेत असलेली ‘सब टीव्ही’वरील ‘चंद्रकांत चिपलुनकर सीडी बम्बावाला’ ही मालिकासुद्धा रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कोणालाही कधीच काही न बोलू शकणाऱ्या ‘फायरमन’च्या आयुष्यात त्याच्या या स्वभावाने काय गमतीजमती होतात यावर मालिका आधारित आहे.

मराठी मालिकाही जोरात!
१८ ऑगस्टच्या मुहुर्तावर मराठी मालिकाही स्पर्धेत उतरल्या आहेत. लग्नानंतर प्रत्येक पावलावर तडजोडींना सामोरे जात नात्यातील प्रेम जपणाऱ्या जोडप्याची कथा सांगणारी ‘का हा दुरावा’ रात्री ९ वाजता भेटीस येणार आहे.
या मालिकेतून तब्बल सहा वर्षांनंतर ‘सुबोध भावे’ छोटय़ा पडद्यावर परतत आहे. रात्री ९.३० वाजता ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून कुशन भद्रिके, निलेश साबळे आणि भाऊ कदम ही जोडगोळी नवीन मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीसाठी एकत्र येणार आहे.
१७ तारखेला ‘ई टिव्ही’वरील ‘झुंज मराठमोळी’ या कार्यक्रमाचा ग्रॅण्ड फिनाले होणार असून सोमवारपासून याची जागा ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण मकरंद अनासपुरे आणि रेणुका शहाणे करणार आहेत.