साऱ्या देशाच्या काळजाला चटका लावणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने चार आरोपींच्या फाशीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.न्यायालयाच्या या निर्णयावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने अभिमान व्यक्त केला आहे.

प्रियांकाने एक भावनिक संदेश तिच्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केला आहे. तिने लिहिलंय की, होय, न्याय मिळण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी गेला. पण, अखेर आज न्यायाचा विजय झाला. हा निर्णय केवळ या चार दोषींपुरता मर्यादित नसून भारतात अशी दुष्कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनाही लागू होतो. त्या गुन्हेगारांची सुटका होता कामा नये, असे निर्भयाने शेवटचा श्वास घेताना म्हटले होते. निर्भयाचा आवाज ऐकणाऱ्या न्यायव्यवस्थेचा मला अभिमान आहे. न्याय मिळावा म्हणून पाच वर्षांपूर्वी संपूर्ण देशाने न्यायव्यवस्थेकडे धाव घेतली होती. या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने बुलंदपणे या कृत्याविरोधात आवाज उठवला होता. अशा गुन्ह्यांतील क्रूरपणा कधीच स्वीकारला जाणारा नाही. २१ व्या शतकातील स्त्रिया अशा क्रूर गोष्टी अन्य स्त्रियांसोबत घडूच कशा देतात, असा सवाल करत प्रियांकाने नाराजी व्यक्त केली.

प्रियांकासोबतच इतरही काही कलाकारांनी निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘निर्भया प्रकरणात अखेर न्याय देण्यात आलाय. या निर्णयामुळे आपल्या समाजातील गुन्हेगारांना जरब बसेल अशी माझी अपेक्षा आहे,’ असे अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विट केलेय.

गायक सोनू निगमने लिहिलंय की, ‘निर्भयाच्या कुटुंबाला त्यांची मुलगी परत मिळू शकत नाही. भारतातील सर्वोच्च न्यायालयाला मी वंदन करतो. पण, अजूनही याप्रकरणी पूर्ण न्याय झालेला नाही. यातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा झालेली नाहीये. निदान त्याचे नाव तरी आम्हाला कळले पाहिजे.’

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री चालत्या बसमध्ये मित्रासोबत चाललेल्या निर्भयावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच लोखंडी सळईने मारहाण केली होती. सिंगापूरच्या रुग्णालयात चालू असलेली तिची जगण्याशी लढाई अखेर २९ डिसेंबर २०१२ला संपुष्टात आली.

https://twitter.com/rohitroy500/status/860431815106076672