बॉलिवूडमध्ये मैत्री आणि वाद हे काही नवे नाही. आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यातील शीतयुद्धवादाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात या दोघींच्यातील वाद संपुष्टात आल्याचे दिसून आले. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. यामध्ये दीपिका आणि कतरिनाने एकमेकींची गळाभेट घेतल्याचे समजते.  या दोघींनी शाहरुख खानच्या वॅनिटी व्हॅनमध्ये भेट घेतली. सूत्रांक़डून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांनी शाहरुखच्या व्हॅनमध्ये तब्बल तासभर गप्पा मारल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी ‘लक्स गोल्डन पुरस्कार’ सोहळ्यात कतरिना आणि दीपिका एकत्र आल्या होत्या. मात्र आपल्यातील दुरावा कायम ठेवत त्यांनी एकमेकींना भेटणे टाळले होते. रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यातील नात्यासंबंधात अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. रणबीर कपूरमुळेच या दोघींमध्ये वाद निर्माण झाल्याचेही बऱ्याचदा बोलले गेले. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर आणि कतरिना यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण आले होते. या तिघांमधील भूतकाळ पाहिला तर कतरिना आणि दीपिका यांच्यातील शीतयुद्धाला पूर्णविराम लागणे कठिण असल्याची चर्चा रंगत असताना कतरिना आणि दीपिकाच्या चाहत्यांना या दोघींच्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण झाल्याचे पाहायला मिळू शकते.

दीपिका ‘पद्मावती’च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. दीपिका हॉलिवूडच्या अॅक्शनपट चित्रपटाने आपल्या निर्मितीचा श्री गणेशा करणार असे म्हटले जात होते. एका हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आता हिंदीत येत असून त्याची निर्मिती चक्क दीपिका करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. त्यामुळे आता ह्रतिकच्या चित्रपटात काम करण्यासाठी दीपिका कसा वेळ काढणार हे लवकरच कळेल. दीपिका सध्या आपल्या आगामी पद्मावती चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. संजल लीला भन्साळी दिग्दर्शित‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिकाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. दीपिका या चित्रपटात राजपूत राणी ‘पद्मावती’ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. भन्साळींच्या चित्रपटातून बऱ्याचदा प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिलजीच्या रुपात दिसेल.

दुसरीक़डे अभिनेत्री कतरिना कैफ यंदाच्या वर्षी तिच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर फारसा प्रभाव पाडू शकली नसली तरीही सोशल मीडियावर मात्र कॅटच्याच नावाचे वारे सध्या वाहत आहेत. एका आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर कतरिनाचा ब्रायडल अवतार सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे.