मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने जास्तीत जास्त लोकांनी येत्या २१ तारखेला होणाऱ्या मतदानात मत द्यावे यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. २१ फेब्रुवारीला मतदान करुन झाल्यावर जे कोणी पुण्यातील मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला येतील त्यांच्या प्रत्येक तिकिटावर १५ टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. ही सूट २१ तारखेला संपूर्ण दिवस असणार आहे. या सूटचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा हीच मल्टिप्लेक्स असोसिएशनची इच्छा आहे. मतदारांना मतदान करण्याची ही अनोखी जनजागृती मल्टिप्लेक्स असोसिएशनने राबवली आहे असेच म्हणायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच अशीच काहीशी सवलत अनेक उद्योगधंद्यातही दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या नागरिकांना लोणावळा व खंडाळ्यातील हॉटेलधील बिलात २० टक्क्य़ांची सवलत देण्यात येणार आहे. २१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा निर्णय लोणावळा, खंडाळ्यातील हॉटेल, रेस्टॉरन्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वागत केले आहे.

मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी याबाबतची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  भागडे यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोणावळा व खंडाळा येथील हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यानुसार २१ फेब्रुवारीला मतदान केल्याचा पुरावा दाखविल्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेलातील वास्तव्यावर २० टक्के, तर रेस्टॉरन्टमध्ये १५ टक्क्य़ांची सवलत देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मतदारयादीतील संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी ०२२३०७७०१६५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती या शहरांची नावे मतदारांना दिसतील. त्यामुळे या शहरात राहणारे मतदार मतदारयादीतील संपूर्ण माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळवू शकतात. मुंबईतील मतदारांसाठी ०२२३०७७०१६५ या टोल फ्री क्रमांकासोबतच ०२२३९६५९४९४ हा क्रमांकदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now voters will get discount after voting in election
First published on: 16-02-2017 at 21:32 IST