गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांच्या विरोधामुळे वादात सापडलेल्या ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण आणि कला दिग्दर्शक अशोक पंडित यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
यापूर्वी अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामुळे ‘सिंघम रिटर्न्स’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला नाही तोच, ‘सिंघम रिटर्न्स’च्या मागे वादाचे शुक्लकाष्ठ लागले. संबंधित ट्रेलरमधील दृश्यांमुळे हिंदू संतांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समितीने सेन्सॉर बोर्डकडे ‘सिंघम रिटर्न्स’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. अखेर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक यांनी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक आयोजित केली. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान सदर आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याचे ठोस आश्वासन हिंदू जनजागृती समितीला देण्यात आले.