एका लॅपटॉपच्या ‘स्लिम सीरिज’च्या जाहिरातीसाठी करिना कपूरने तिचे ‘झिरो साइज फिगर’ झळकवताच त्या कंपनीच्या लॅपटॉपची बरीच विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखने त्याच्या जाहिरातींनी मुलांना च्यवनप्राश खाण्यास आणि दोनदा ब्रश करण्यास प्रोत्साहित केले. अमिताभ यांनी केसांच्या तेलाची जाहिरात देताच अनेकजण ते तेल घेण्यास प्रवृत्त झाले. सध्याच्या घडीला कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा जाहिरातींसाठीच अधिक ओळखले जातात. पण, गेल्या काही वर्षांमध्येच कलाकारांनी जाहिराती करण्याचा ट्रेण्ड सुरु झाला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. राजेश खन्ना, झीनत अमान, दिलीप कुमार, धर्मेंद्र यांच्यापासून ते अगदी किशोर कुमार यांच्यापर्यंत अनेकांनी त्या काळातील प्रसिद्ध जाहिरातींमध्ये काम केले. त्यापैकीच काही जाहिरातींवर एक नजर टाकूया.

1. बॉम्बे डाइंगच्या एका टॅगलाइनने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यावेळी या कंपनीने जनमत घेऊन अमिताभ यांची जाहिरातीसाठी नियुक्ती केली होती. ‘सुपरस्टार मटेरियल’ या दोन शब्दांनीच त्या उत्पादनाची विश्वासार्हता वाढवली आणि बिग बींप्रमाणेच बॉम्बे डाइंगच्या उत्पादनांनीदेखील लोकांच्या मनावर राज्य केले.

2. शत्रुघ्न सिन्हा यांनी बॅगपायपरच्या सोड्याची जाहिरात केली होती. या जाहिरातीवर त्यांची स्वाक्षरीसुद्धा आहे.

3.आपल्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढून आपली शरीरयष्टी दाखवण्यासाठी सलमान खान ओळखला जातो. पण, त्याच्याआधीही एक अभिनेता असा होता ज्याने आपल्या पिळदार शरीरयष्टीने सर्वांना वेड लावले. तो अभिनेता म्हणजेच जॅकी श्रॉफ. जीन्सच्या या जाहिरातीत ‘शर्टलेस’ जॅकी श्रॉफ पत्नी आणि मॉडेल आयशा दत्तासह दिसतो.

4.या जाहिरातीचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाचे नाव लिहिण्याआधी त्यावर दिलीप कुमार यांचे नाव लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीवर विविध लोणच्यांचे प्रकार लिहिण्यात आले आहेत.

5. लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे या एकमेव जाहिरातीत एकत्र झळकले.

6.बॉलिवूडच्या इतिहासात खलनायकांच्या यादीत ‘शोले’च्या गब्बर सिंहचे नाव आवर्जून घेतले जाते. त्या काळी हिरोची चलती असताना अमजद खान हे जाहिरात करणारे पहिले खलनायक होते. लहान मुलांच्या बिस्कीटांची त्यांनी जाहिरात केली हे त्यामागचे वैशिष्ट्य. आठवतंय ना, ‘दूर दूर जब गाव में बच्चा रोता है..’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.