सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या लढवत आपल्या जाळ्यात कोणाला ना कोणाला ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. असे पुन्हा होऊ नये म्हणून हळहळत न बसता सावधानता बाळगणे आवश्यक असते. हीच सावधानता बाळगून स्वत: त्या जाळ्यात न अडकता त्या गुन्हेगारांकडूनच पैसे उकळणारे आजोबा-आजी नुकतेच भेटले ते ‘नायजेरियन प्रन्सि’ या एकांकिकेतून.
निमित्त होते ‘सनवर्ल्ड करंडक’ एकांकिका स्पर्धेचे. ‘ज्येष्ठ नागरिक संघ विमाननगर’ यांनी सादर केलेल्या या एकांकिकेचे लेखन केले होते शुभदा दळवी यांनी आणि त्यांनी या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिकही पटकावले. नवं, ताजे कोरे लेखन, उत्तम दिग्दर्शन केलेली ही एकांकिका निखळ आनंदाबरोबरच सहजतेने जाता-जाता मौलिक संदेश देऊन गेली.
‘मधुस्नेह’ संघाच्या ‘सांजिगुडा’ या एकांकिकेने या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका म्हणून प्रथम क्रमांक पटकावला. गुढतेचे सावट, उत्तम नेपथ्य आणि रंगमंचावरील सहज वावर यामधून ही एकांकिका नुसतीच रंगली नाही तर प्रेक्षकांनादेखील गुंग करून गेली. या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन संज्ञा कुलकर्णी यांचे होते. त्यांनी या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक पटकावले. वर्तमानात जगा, तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, एकमेकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून काळजी घ्या, प्रौढ वयात समवयस्क साथीदाराची आवश्यकता, घटस्फोट चांगला का वाईट, लग्नाचे दिवस जवळ आलेल्या आणि अत्याचार झालेल्या स्त्रीसह तिच्या कुुटुंबाची व्यथा मांडणाऱ्या अशा विविध विषयांमधून ज्येष्ठांनी ऊर्जादायी नाट्य सादरीकरण केले.
विनोदाच्या अंगाने जाणारी आणि दोन विहीणींमधील नोकझोक दाखवणारी ‘आम्ही दोघी विहीणी तोडीच्या’ या एकांकिने स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ही एकांकिका सादर केली होती ‘ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान, वारजे’ यांनी. हा संघ या स्पर्धेत प्रथमच सहभागी झाला होता, पण त्यातील सर्वच कलाकार मंडळींनी केवळ अभिनय कौशल्यच नाही तर उत्तम दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवले.
छोटे घर आणि जास्त माणसे असल्यामुळे सुनेची होणारी कुचंबणा दाखवणाऱ्या ‘सवंगडी सांस्कृतिक विभागा’च्या ‘घर आपलं सर्वांचं’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला.
संतोष वडके आणि अनुपमा कुलकर्णी यांनी परीक्षण केलेल्या या स्पर्धेचे यंदा चौदावे वर्ष होते आणि या स्पर्धेत सतरा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या कलागुणांना वाव तर मिळतोच आणि राहून गेलेली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याची भावना ज्येष्ठ नागरिक या निमित्ताने व्यक्त करतात. अत्यंत ऊर्जा, हौसेने पाठांतर आणि अभिनय कौशल्यांसह या स्पर्धेत सहभागी होताना आम्हाला परीक्षण करताना ज्येष्ठांच्या ऊर्जेचे कौतुक तर वाटत होते, त्याबरोबरच त्यांची ही ऊर्जा आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत दोन्ही परीक्षकांनी व्यक्त केले.
नाट्यस्पर्धा म्हटले की, अभिनयाची वैयक्तिक पारितोषिके आलीच. ‘नाट्यपुष्प पुणे’ यांच्या ‘निशब्द’ या एकांकिकेतील अत्याचारीत मुलीच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या सुहास संत यांनी उत्कृष्ट अभिनय पुरुष या गटातील पारितोषिक मिळवले. तर ‘ख खटल्याचा’ या शब्दरंग कला साहित्य कट्ट्याच्या ज्योती कानिटकर यांनी उत्कृष्ट अभिनय स्त्री या गटात पारितोषिक पटकावले.
‘निशब्द’चे लेखन नितीन बगवाडकर यांनी तर ‘ख खटल्याचा’ एकांकिकेचे लेखन अशोक अडावदकर यांनी केले होते. डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या चमूने या एकांकिका स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. या स्पर्धेसाठी मृणालिनी वझे यांनी सूत्रसंचलन केले होते. या एकांकिका स्पर्धेबरोबरच ज्येष्ठांसाठी कल्पनाविस्तार, नाट्यछटा, समूह गीत स्पर्धा अशा विविध स्पर्धाही एकाच वेळी सुरू होत्या. एकांकिका स्पर्धेत सहभागी होणारी मंडळी इतर स्पर्धांमध्येही न दमता तेवढ्याच उत्साहाने सहभागी होत होती आणि बक्षिसे पटकावत होती. यातून ज्येष्ठांमधील उत्साह आणि ऊर्जा दोन्हींचेही दर्शन होत होते.