अलीकडच्या काळात बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत, पण त्या तुलनेत दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत दक्षिण चित्रपट उद्योगाने खूप प्रगती केली आहे. प्रेक्षकांमध्ये मल्याळम चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळत आहे. २०२३ मध्ये असाच एक मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं.
फक्त २६ कोटींमध्ये बनलेला हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि अवघ्या २५ ते ३० दिवसांत त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल १७७ कोटींची कमाई केली होती. ज्यूड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटाला भारताची अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुराच्या कथेवर आधारित या चित्रपटाचे सर्वत्र खूप कौतुक झाले. बजेटपेक्षा नऊ पट जास्त कमाई करणारा हा चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला चित्रपट
२०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मल्याळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे करण्यात आली होती. जवळपास २२ चित्रपटांपैकी भारतीय चित्रपट महामंडळाने या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड केली होती. हा २०२३ चा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की निर्मात्यांनी तो हिंदीसह इतर भाषेत डब केला होता.
पूर परिस्थितीवर बेतलेला चित्रपट
केरळमधील भयानक पुराचे प्रसंग ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत लोकांनी ज्या पद्धतीने समजूतदारपणा दाखवत जगण्यासाठी उपाय शोधले, त्यावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे. चित्रपटात असे अनेक लोक दाखवले आहेत जे पुरासारख्या भयंकर परिस्थितीत आणि आपल्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी घराबाहेर पडून संघर्ष करतात.
करोनाच्या साथीत शूटिंग रखडलं
‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ चित्रपटात टोविनो थॉमस, आसिफ अली आणि अपर्णा बालमुरली सारखे उत्तम कलाकार होते. तसेच कुंचको बोबन, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना करोनाची साथ आली होती, त्यामुळे शूटिंग बराच काळ रखडले होते. चित्रपट पूर्ण करण्यास निर्मात्यांना बराच वेळ लागला होता.