दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील लेडी सुपरस्टार अशी ओळख असलेल्या अभिनेत्री नयनताराचा ‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटात प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त विधानं करण्यात आल्याचे आरोप झाले. तसेच यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं कारण देत निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वाढता वाद पाहता नेटफ्लिक्सने हा चित्रपट हटवला. त्यानंतर आता नयनताराने माफी मागितली आहे.
नयनताराने इन्स्टाग्रामवर माफी मागितली आहे. त्या निवेदनात मोठ्या अक्षरात जय श्री राम लिहिलं आहे. “मी अतिशय जड अंतःकरणाने हे निवेदन लिहित आहे. माझा ‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट फक्त आर्थिक लाभाच्या हेतून बनवलेला नाही, तर या चित्रपटातून आम्हाला सकारात्मक संदेश द्यायचा होता, पण नकळत काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्हाला वाटलं नव्हतं की सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळाल्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ओटीटीवरून हटवला जाईल. लोकांच्या भावना दुखवायचा माझा किंवा माझ्या टीमचा हेतू नव्हता. मी देवाला मानणारी व्यक्ती आहे. मी देवाची पूजा करते आणि देशभरातील मंदिरांमध्ये दर्शनाला जाते. मी ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्या सर्वांची मी माफी मागते. माझ्या गेल्या दोन दशकांच्या चित्रपट करिअरमध्ये माझे उद्दिष्ट केवळ सकारात्मकता पसरवणे हे राहिलंय,” असं नयनताराने लिहिलं आहे.
‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर २९ डिसेंबर रोजी तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आला होता. इतकंच नाही तर चित्रपटाचे निर्माते व नयनताराविरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.