Jarann OTT Release : २०२५ या वर्षातील आतापर्यंतच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जारण’. ६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तसंच अनेकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुकही केलं. अमृता सुभाष, अनिता दाते केळकर आणि किशोर कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘जारण’ हा भयपट अनेकांच्या पसंतीस उतरला.

पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘जारण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. त्यानंतर टीझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ने बॉक्स दहा दिवसांत एकूण चार कोटींच्या आसपास कमाई केली होती. सुरुवातीला संथगतीने कमाई करणाऱ्या ‘जारण’ने नंतर मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली.

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला ‘जारण’ आता ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. अनेक प्रेक्षकांना काही कारणास्तव ‘जारण’ हा भयपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघणं शक्य झालं नसल्यास; त्यांना आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. पण ‘जारण’ नक्की कोणत्या ओटीटी माध्यमावर आणि कधी प्रदर्शित होणार आहे? चला जाणून घेऊ…

लेखक हृषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित ‘जारण’ सिनेमा येत्या ८ ऑगस्टला झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी ५ च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. झी ५ वर ‘जारण’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. झी ५ च्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘जारण’चं पोस्टर शेअर करत “‘जारण’ म्हणजे ब्लॅक मॅजिक हे जारण आता सुरु झालं आहे, त्याचा परिणाम ८ ऑगस्टला दिसेल फक्त मराठी झी ५ वर” असं म्हटलं आहे.

‘जारण’बद्दल बोलायचं झाल्यास काळ्या जादूवर आधारित असलेली कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी ‘जारण’ या भयपटात भय आणि मानसिक गोंधळाचे मिश्रण अतिशय प्रभावीपणे सादर केले आहे. चित्रपटाची कथा साधी वाटत असली; तरी ती खूप खोल आहे. शिवाय चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत चित्रपटाला अधिक भयानक बनवतं.

दरम्यान, ‘जारण’मध्ये अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम या मुख्य कलाकारांबरोबरच ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख या कलाकारांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.