बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी करणाऱ्या आऱोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातच्या वाडनगरमधून पोलिसांनी आऱोपीला अटक केली. शाकिर मकराणी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी एल्विश यादवला व्हॉट्सअॅपवर खंडणी मागणारा एक मेसेज आला होता. ज्यात सुरुवातीला ४० लाख आणि नंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी एल्विशने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना खंडणी प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
आरोपीच्या प्राथमिक चौकशीत तो आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याने युट्युबवर एल्विशचा व्हिडिओ पाहिला होता आणि त्यातून प्रभावित होऊन त्याने करोडपती होण्याच्या उद्देशाने पैसे कमवण्यासाठी ही योजना आखली. त्यासाठी त्याने १४०० रुपयांचे बनावट सिमकार्ड विकत घेतले. त्याचा वापर करून त्याने एल्विशला खंडणीचा मेसेज पाठवला होता.
कोण आहे एल्विश यादव?
एल्विश यादव हा सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. एल्विशचा जन्म हरियाणातील गुरुग्राम येथे झाला. सोशल मीडियावर एल्विशच्या नावाने दोन युट्यूब चॅनल आहेत. एल्विश इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच एल्विश बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.