तुम्हाला ओटीटीवर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर आज आम्ही एका सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. प्रेम, सस्पेन्स व क्राइमचा मिलाफ असलेला हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. १ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
या चित्रपटाचे नाव ‘डीप वॉटर’ (Deep Water) असे आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक इरॉटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक एड्रियन लायन यांनी दिग्दर्शित केला आहे. हॉलीवूड स्टार बेन एफ्लेक आणि अॅना डी अर्मास यात मुख्य भूमिकेत होते. सुरुवातीला कोविडमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. नंतर निर्मात्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करायचं ठरवलं.
‘डीप वॉटर’ चित्रपटाचा प्रीमियर १८ मार्च २०२२ रोजी हुलू ओटीटीवर झाला. तसेच हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर देखील उपलब्ध आहे. इथेही तो प्रेक्षक सहज पाहू शकतात. या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास यात विक आणि मेलिंडा या दोघांचं नातं अनेक टप्प्यांमधून जातं. पती असूनही मेलिंडा इतर लोकांशी शारीरिक संबंध ठेवू लागते.
विक व मेलिंडा एके दिवशी एकत्र पार्टीला जातात. तिथे मेलिंडा जो नावाच्या पुरुषाबरोबर खूप वेळ घालवते. हे पाहून सर्वजण हैराण होतात, पण विक शांत असतो. मग विक जो जवळ जातो आणि त्याला सांगतो की त्याने त्याच्या पत्नीबरोबर सेक्स करणाऱ्या सर्वांना कसं मारलं. तो जोला धमकी देतो. पण तरी मेलिंडा जोला घरी बोलावायची. ते दोघेही विकसमोर बेडरूममध्ये वेळ घालवायचे, यामुळे विक खूप दुखावतो आणि शेवटी तो जोला मारतो.
पाहा ट्रेलर
मेलिंडा इथेच थांबत नाही. ती नंतर चार्ली नावाच्या पुरुषाबरोबर संबंध ठेवते. तो तिचा पियानो टीचर असतो. स्विमिंग पूलमध्ये ती चार्लीबरोबर रोमँटिक होते, हे पाहून विक संतापतो आणि तो चार्लीला पाण्यात बुडवून मारतो. या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने घडतात, त्या पाहून मेलिंडाला संशय येतो की तिचा पतीच या सर्वांचे खून करतोय. हे सगळं होत असतानाही विक व मेलिंडाचं प्रेम कमी होत नाही. दुसरीकडे ती तिचा बालपणीचा मित्र टोनीबरोबर संबंध ठेवते. ती विकला सांगते की तिने सर्वात आधी टोनीबरोबर संबंध ठेवले होते. हे ऐकून विक पुन्हा चिडतो आणि तो टोनीचा खून करतो.
एकीकडे विक व मेलिंडाचं एकमेकांवर असलेलं प्रेम, तर दुसरीकडे विकचं खून करणं यादरम्यान येणारे सगळे ट्विस्ट व टर्न शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. इतके खून करणारा विक पोलिसांच्या तावडीत सापडतो का? विकवर प्रेम असूनही मेलिंडा इतर पुरुषांशी संबंध का ठेवते? तिचं खरंच विकवर प्रेम आहे का? की तिच्या या कृतीमागे इतर कारण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘डीप वॉटर’ चित्रपट पाहावा लागेल. हा चित्रपट तुम्ही दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.