Homebound Movie OTT Release Date : जान्हवी कपूर व इशान खट्टरच्या ‘होमबाउंड’ या चित्रपटाची यंदा खूप चर्चा झाली. फक्त देशातच नाही तर जगभरातील लोकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाच्या कथेने अनेकांचं मनं जिंकलं. अशातच आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
नीरज घेवान दिग्दर्शित व लिखित ‘होमबाउंड’ चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडला. भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट २१ मे २०२५ रोजी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ येथे दाखवण्यात आलेला. नंतर २६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. परंतु, ज्या चित्रपटाचं ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’सारख्या नामांकित चित्रपट मोहोत्सवात कौतुक झालं, त्याला आपल्याकडे बॉक्स ऑफिसवर फार खास प्रतिसाद मिळाला नाही.
‘एबीपी’च्या वृत्तानुसार जान्हवी कपूर व इशान खट्टर यांच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४.७९ कोटी इतकी कमाई केली. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाची कथा उत्तर भारतातील एका छोट्या गावातील दोन मित्रांभोवती फिरते. दोघांचं पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. परंतु, त्यांना सामाजिक संघर्षाला सामोरं जावं लागतं. यामध्ये इशान खट्टरने शोएब हे पात्र साकरालं आहे, तर विशाल जेठवाने चंदन हे पात्र साकारलं आहे. एक मुसलमान असतो आणि एक दलित. त्यांना पोलिस अधिकारी होऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असते.
नीरज घेवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ चित्रपटात जान्हवी कपूर, इशान खट्टर आणि विशाल जेठवा हे कलाकार पाहायला मिळतात. जर तुम्हाला एक चांगलं कथानक आणि दमदार अभिनय, उत्तम दिग्दर्शन असलेला चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहायला हवा. यामधून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या मेकर्सने केला आहे.
‘होमबाउंड’ ओटीटी रिलीज डेट
जान्हवी कपूर व इशान खट्टर यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट आता तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट लवकरच २१ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
