Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Kokan Video : मराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकार मंडळी ही कोकणातली आहेत, त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आणि कामातून ब्रेक घेत ते आपल्या गावी कोकणात जातात. काहीजण कोकणातला निसर्ग अनुभवण्यासाठी जातात; तर काहीजण आपल्या गावी जात भातलावणी करतात. असाच एक मराठी अभिनेताही कोकणात गेला आहे, हा अभिनेता म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी एक म्हणजेच निखिल बने. निखिल बने आणि त्याचं कोकण प्रेम हे जगजाहीर आहे. निखिल हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे तो त्याचं गावावर असलेलं प्रेम सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे व्यक्त करताना दिसतो. याआधी त्याने अनेक व्हिडीओ शेअर करत त्याच्या कोकण प्रवासाची सफर घडवून आणली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
निखिल बनेचा सोशल मीडियावर चांगलाच चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाद्वारे निखिल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. विशेषतः गावाकडच्या आठवणीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
अशातच निखिलने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना कोकणाची खास सफर घडवून आणली आहे. मात्र, यावेळी अभिनेता त्याच्या गावी न जाता ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून लोकप्रिय असलेला प्रसाद गावडेच्या गावी गेला होता. या कोकण प्रवासाची झलक निखिलने व्हिडीओमार्फत शेअर केली आहे.
यापुढे तो व्हिडीओमध्ये असं म्हणतो, “ठाण्यात जनशताब्दी एक्स्प्रेस पकडली आणि निसर्गाचा आनंद घेत, आम्ही येऊन पोहोचलो सावंतवाडीला. सावंतवाडीला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही जेवलो आणि त्यानंतर कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडेच्या जीवनशाळाला भेट द्यायला. यानिमित्ताने माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. प्रसादला भेटून खूप आनंद झाला. मग आम्ही भातलावणी करायला गेलो. भातलावणीची ही माझी पहिलीच वेळ होती. पण खूप काही शिकायला मिळालं. पावसात, चिखलात काम करून प्रसन्न वाटलं आणि काम केल्याचं तसंच नवीन काही तरी शिकल्याचं समाधान मिळालं. रात्री येऊन पुन्हा गप्पा रंगल्या. प्रसादशी बोलणं म्हणजे वैचारिक मेजवानी आहे.”
दरम्यान, या व्हिडीओमध्ये निखिलने सांगितल्याप्रमाणे चिखलात भातलावणी केल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या व्हिडीओमधून पावसाळ्यातलं कोकणाचं मनमोहक निसर्गसौंदर्यही पाहायला मिळत आहे. निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्याच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे.