Inspector Zende New Series : मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीसह हिंदी तसेच दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रिया बापट, अमृता खानविलकर, महेश मांजरकेर, सई ताम्हणकर, वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार गेल्या महिन्यांमध्ये विविध हिंदी वेब सीरिज व सिनेमांमध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं. आता मराठी टेलिव्हिजनवर काम करणारा आणखी एक लोकप्रिय अभिनेता हिंदी सीरिजमध्ये झळकणार आहे.

लवकरच नेटफ्लिक्सवर ‘इनस्पेक्टर झेंडे’ ही नवीन सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज ५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इनस्पेक्टर झेंडे’ या सीरिजमध्ये काही हरिश दुधाडे, गिरीजा ओक, भाऊ कदम, सचिन खेडेकर असे मराठी कलाकार एकत्र झळकणार आहेत. याशिवाय पोस्टरवर मागे आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजेच ओंकार राऊत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता ओंकार राऊत आता बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीसह काम करण्यास सज्ज झाला आहे. ही मोठी संधी मिळाल्याबद्दल अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘इनस्पेक्टर झेंडे’ ही सीरिज क्राइम थ्रिलर संकल्पनेवर आधारित असेल. यामध्ये मनोज बायपेयी मधुकर झेंडे ही भूमिका साकारत आहेत. मात्र, मराठी कलाकार यामध्ये कोणत्या भूमिका साकारत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, ‘इनस्पेक्टर झेंडे’ ही वेब सीरिज ५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. दरम्यान, ओंकार राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्याने मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, हास्यजत्रेमुळे त्याला घराघरांत एक नवीन ओळख मिळाली.