ओटीटीवर अनेक रंजक क्राइम, थ्रिलर चित्रपट उपलब्ध आहेत. हे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. काहींमध्ये तर इतके ट्विस्ट असतात की डोकं चक्रावतं. तुम्ही स्क्रीनवरून थोडावेळ नजर हटवली तर तुम्हाला पूर्ण कथा समजणार नाही.

आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळालेल्या या सस्पेन्स मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचा क्लायमॅक्स दमदार आहे. एका लहान शहरातील या कथेत अनेक रंजक वळणं येतात. एका कुटुंबावर आधारित हा चित्रपट आहे. यातील हिरोच्या वडिलांना स्मृतीभ्रंश असतो, ते बंदूक कुठे ठेवली ते विसरतात आणि मग त्या बंदुकीचा शोध सुरू होतो.

सप्टेंबर २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट ७ कोटी रुपये होते आणि त्याने जगभरात जवळपास ११ पट जास्त म्हणजे ७५ कोटी रुपये कमाई केली होती. आता तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

चित्रपटाचे नाव काय?

आयएमडीबीवर ८ रेटिंग असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘किष्किंधा कांडम: अ टेल ऑफ ३ वाईज मंकीज’ असे आहे. चित्रपटाचे हे नाव रामायणातील किष्किंधा कांडावरून घेतले आहे. ‘किष्किंधा कांडम’ सिनेमात माकडांना महत्त्व देण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा अजयेट्टन, अपर्णा, अप्पू पिल्लई नावाच्या तीन लोकांच्या सभोवताली फिरतो.

‘किष्किंधा कांडम’ या चित्रपटाची सुरुवात अजयेट्टन व अपर्णा यांच्या कोर्ट मॅरेजपासून होते. अजयेट्टनच्या वडिलांचे नाव अप्पू पिल्लई असतं. ते मुलाच्या लग्नात सहभागी होत नाहीत. अप्पू पिल्लई भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले असतात. त्यांच्याकडे एक एक परवाना असलेली बंदूक असते. जिल्ह्यात निवडणुकी असल्याने सर्वांना बंदुका जमा करण्यास सांगितलं जातं.

सगळे बंदुका जमा करतात अप्पू पिल्लई करू शकत नाही. त्यांची बंदूक हरवली आहे असं नंतर पोलिसांना समजतं. मग या बंदुकीचा शोध सुरू होतो. बंदूक सापडत नसल्याने अजयेट्टन व अपर्णाची काळजी वाढते, पुढे चित्रपटाची कथा वेगळ्याच ट्रॅकवर पोहोचते.

याचदरम्यान बऱ्याच गोष्टी समोर येतात. अजयेट्टनचे हे दुसरे लग्न असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालाय, त्याचा मुलगा बेपत्ता आहे असं समजतं. अजयेट्टन मुलाला शोधण्यासाठी फार प्रयत्न करत नसल्याचं दिसून येतं. दुसरीकडे अप्पू आपल्या खोलीतच असतात, त्यांना स्मृतीभ्रंश असतो. ते फक्त मोजक्याच लोकांना भेटत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपर्णाला अप्पू पिल्लई यांच्यावर संशय येतो, मग ती त्यांच्या खोलीची झडती घेते. त्यानंतर या सिनेमात अनेक ट्विस्ट येतात. हा रंजक चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. हा मल्याळम चित्रपट ओटीटीवर हिंदी, तमिळ व तेलुगू भाषेत उपलब्ध आहे.