Panchayat Fame Actor Health Update : एखादा आजार तुम्हाला अनेकदा चांगल्या गोष्टी शिकवून जातो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत असतो. याच दुर्लक्षातून आपल्यावर प्रकृतीबद्दलचं संकट येतं आणि ते आपल्याला शहाणपणसुद्धा शिकवून जातं… असाच एक अभिनेता आहे; ज्याला त्याच्या तब्येतीमुळे एक मोठी शिकवण मिळाली आहे आणि त्यामुळे त्यानं त्याची एक वाईट सवयही सोडली आहे.
‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आसिफ खान काही दिवसांपासून त्याच्या आरोग्यामुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये आसिफनं‘दामादजी’ची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते. मात्र, आता तो या आजारातून बाहेर पडत आहे आणि त्यासाठी त्यानं काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत.
जून महिन्यात त्याला हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणं जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याबद्दल त्यानं स्वत:च सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. अभिनेता त्याच्या प्रकृतीबद्दलचे अनेक अपडेट्स देत असतो. अशातच त्यानं पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्यानं धूम्रपानाची सवय सोडल्याची माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये आसिफ खान म्हणतो, “लोक म्हणतात की, २१ दिवसांत कुठलीही चांगली किंवा वाईट सवय सुटू शकते. मला धूम्रपान सोडून २१ दिवस झाले. फ्रेंडशिप डेनिमित्त मला वाटलं की, माझ्या मित्रांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, यापेक्षा योग्य दिवस नसू शकतो. आयुष्यात अनेक चढ-उतार हे येतच असतात. वर चढताना तुमच्याबरोबर अनेकांची गर्दी असते; परंतु उताराच्या म्हणजेच तुमच्या पडत्या काळात जे तुमच्याबरोबर राहिले, त्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा.”
आसिफ खान इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे आसिफ चाहत्यांना आवाहन करीत म्हणतो, “स्वतःच्या चुका समजून घेण्यासाठी, योग्य लोकांची ओळख पटण्यासाठी, रुग्णालयाच्या बेडवर जाण्याची वाट बघू नका. या मोठमोठ्या शहरांमधल्या गोंगाटात आपलं साधंपण हरवू नका. चहा आवडत असेल, तर तोच घ्या; लोकांना बघून ब्लॅक कॉफीकडे जाऊ नका. रोज मित्रांना भेटा.”
पुढे त्यानं सिगारेटची इमोजी वापरत, “आयुष्याचे सौदे २०-३० रुपयांच्या गोष्टीशी करू नका. या सगळ्या गोष्टी नंतर वाचून शक्यतो हसायला येईल… पण मी मनापासून बोलतोय…”, असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टच्या शेवटी त्यानं सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेता सध्या घरी असून, ही पोस्ट जुनी असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.