Harry and Meghan Netflix documentary: ब्रिटीश राजघराण्याचे धाकटे युवराज हॅरी यांनी राजघराण्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. राजघराण्याकडून कायम एकमेकांची गुपित सार्वजनिक केली जात असल्याचं हॅरी यांनी म्हटलं आहे. या प्रकाराला हॅरी यांनी ‘डर्टी गेम’ असं म्हटलं असून नेटफ्लिक्सच्या बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्रीमध्ये मुलाखतीदरम्यान हे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. हॅरी आणि त्यांची हॉलिवूड अभिनेत्री असलेली पत्नी मेगन मार्कल यांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंट्री सोमवारी प्रदर्शित झाली. तीन भागांमध्ये ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली जाणार आहे.

पहिला भाग हा मंगळवारपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणार आहे. हॅरी आणि मेगन राजघराणाऱ्यासंर्भातील कोणत्या गोष्टींबद्दल भाष्य करतात याकडेसंपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. ड्युक आणि डचेस ऑप सुसेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजेच राजघराण्यातील राजकुमार आणि राजकुमारी अशी ओळख असलेल्या या दोघांकडून अनेक गौप्यस्फोट केले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन वर्षांपूर्वी हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये स्थायिक झाले. त्यांच्या या निर्णयामुळे ब्रिटीश राजघराण्यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या ज्यामध्ये वर्णद्वेषी वागणूक दिल्याचा मुद्दाही चर्चेत होता.

हॅरी यांनी या मुलाखतीमध्ये आपण आता राजघराण्यातील व्यक्तींच्या संपर्कात फारसे नाही असंही म्हटलं आहे. खास करुन इंग्लंडचे राजे किंग चार्लस यांच्याशी तसेच थोरला भाऊ प्रिन्स विल्यम्सबरोबर आपण फारसं बोलत नाही असं हॅरी यांनी सांगितलं आहे. “कोणालाही पूर्ण सत्य ठाऊक नाही मात्र आम्हाला पूर्ण सत्य ठाऊक आहे,” असं हॅरी या डॉक्युमेंट्रीच्या ट्रेलरमध्ये सांगताना दिसतात. तर मेगन या आपले अश्रू पुसत असल्याचं दिसत आहे.

या छोट्या क्लीपमध्ये ब्रिटीश राजघराण्याचं वास्तव्य असलेल्या बर्किंग्हम पॅलेसमध्ये काम करणारे लोक राजघराण्यातील व्यक्तींबद्दल पत्रकारांना माहिती पुरवत असल्याचं हॅरी सांगत आहेत. “कुटुंबामध्ये एक नियोजित उतरंडीची पद्धत (हायरारकी) आहे. खासगी माहिती बाहेर जात आहे याची कल्पना आहे पण काही गोष्टी जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. हा एक घाणेरडा खेळ (डर्टी गेम) आहे,” असं हॅरी सांगतात.

या ट्रेलरमधील आवाज हा हॅरी यांच्या आवाजाशी साधर्म्य साधणारा असून व्हॉइसओव्हरच्या माध्यमातून हा आवाज, “या संस्थात्मक पद्धतीनेमध्ये लग्न करुन येणाऱ्या माहिलेचं दु:ख आणि हाल,” याबद्दल सांगताना ऐकून येतं. हा व्हॉइसओव्हर सुरु असताना हॅरी यांची दिवंगत आई प्रिन्सेस डायना आणि वहिनी केट यांचे फोटो स्क्रीनवर दिसतात.

यापूर्वी मार्च २०२१ मध्ये ओपेरा वेन्फ्री यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हॅरी आणि मेगन यांनी आपल्या नात्यासंदर्भात आणि राजघराण्याबरोबर असलेल्या संबंधांबद्दल भाष्य केलं होतं. या मुलाखतीनंतर राजघराण्याकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामधून काही गैरसमज असल्याचं सुचित करण्यात आलं होतं. प्रिन्स विल्यम यांनी आमचं कुटुंब वर्णद्वेष करणारं नाही, असं म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नेटफ्लिक्सच्या या सिरीजवर आधारित वृत्तांकन ब्रिटनमधील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी केलं आहे. या ट्रेलरमध्ये, “आता पुन्हा मागे वळून घडलेल्या गोष्टींकडे पाहताना पुढे जाणं कठीण आहे,” असं प्रिन्स हॅरी सांगताना दिसत आहेत. मेगनला राजघराण्यातील कुटुंबाबद्दल आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना हॅरी यांनी हे विधान केलं आहे.