अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तमिळ व मल्याळम भाषेतील अनेक चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. असाच एक चित्रपट ४ वर्षांपूर्वी आला होता. हा लीगल ड्रामा चित्रपट तुम्ही आता ओटीटीवर पाहू शकता.

चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठी नाही, समाजात बदल घडवून आणण्यासाठी ते एक शक्तिशाली माध्यम आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांनी या बाबतीत अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स थ्रिलर अशा विविध शैलींमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या दक्षिण चित्रपटांनी लीगल ड्रामामध्येही आपली खासियत दाखवली आहे.

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा एका सत्य घटनेवर आधारित कायदेशीर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाने समाजातील वंचित घटकाच्या समस्या जगासमोर मांडल्या होत्या.

सूर्याचा दमदार अभिनय

या चित्रपटात तमिळ सुपरस्टार सूर्याने वकिलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाला IMDb वर १० पैकी ८.७ रेटिंग मिळाले आहे. सूर्याने यापूर्वी ‘गजनी’ आणि ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती, परंतु या चित्रपटातील त्याच्या भावनिक अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं.

खिळवून ठेवणारा चित्रपट

‘जय भीम’ हा चित्रपट फक्त कोर्टरूम ड्रामा नाही. यात क्राइम, मिस्ट्री, थ्रिलरही आहे. २ तास ४५ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात समाजातील वंचित घटकांचे जीवन आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दाखवण्यात आला आहे. १९९० च्या दशकात तामिळनाडूमध्ये घडलेली एक भयानक घटना या चित्रपटाची प्रेरणा ठरली. या सिनेमात दाखवण्यात आलेली कोर्टातील दृश्ये प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.

आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय व त्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या एका वकिलाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्राइम व्हिडीओवरील या चित्रपटाला ऑस्कर नामांकनासाठी निवडण्यात आला होता, पण तो शॉर्टलिस्ट होऊ शकला नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात सूर्यासह लिजोमोल जोस, मणिकंदन, रजिशा विजयन, जिजॉय राजगोपाल या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. लिजोमोल जोसने आदिवासी महिलेची भूमिका साकारून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावुक केलं होतं. मणिकंदन आणि रजिशा विजयन सारख्या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला.