Kantara Trending on OTT : अनेकांना ओटीटीवर नवनवीन चित्रपट पाहायला आवडतात. काही चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर राज्य करतात. असाच एक चित्रपट सध्या ट्रेडिंग आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट तीन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट चर्चेत असण्याचं एक कारण म्हणजे त्याचा प्रीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या २ तास २७ मिनिटांच्या चित्रपटाची कथा तुम्हाला थक्क करेल. आम्ही नेमक्या कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, ते जाणून घेऊया.
३ वर्षांपूर्वीचा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग
एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी ओटीटीवर ट्रेंड होतोय ही मोठी गोष्ट आहे. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचं नाव ‘कांतारा’ आहे. तो २०२२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे बजेट फक्त १६ कोटी रुपये होते, पण त्याने जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई करून इतिहास रचला.
‘कांतारा’ चित्रपटाची कथा एका जंगलापासून सुरू होते. जमीनदाराला जंगल हडप करायचे असते. पण जंगलाजवळील एका गावातील लोक त्याला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटतं की त्यांचे देव जंगलात राहतात आणि ते कोणालाही त्यांच्या देवांची जमीन हडप करू देणार नाहीत. यामुळे एक मोठा वाद निर्माण होतो आणि मग त्यात प्रशासन हस्तक्षेप करते. त्यानंतर चित्रपटाचा हिरो व पोलीस समोरासमोर येतात. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अंगावर शहारे आणणारा आहे.
‘कांतारा’ तुम्हाला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. तुम्हाला ‘कांतारा’ हिंदीमध्ये पाहायचा असेल तर तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
आयएमडीबीवर मिळाले ८.२ रेटिंग
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाचा प्रीक्वल ‘कांतारा चॅप्टर १’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘कांतारा’ला आयएमडीबीवर १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे.