Top 5 Most Watched Movies OTT: दर आठवड्याला ओटीटीवर अनेक चित्रपट, वेब सीरिज रिलीज होतात. काही चित्रपट थिएटर रिलीजनंतर ओटीटीवर येतात, तर काही थेट ओटीटीवर रिलीज केले जातात. ऑरमॅक्स मीडियाने २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप पाच सिनेमांची यादी जाहीर केली आहे.
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील पाच चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. इब्राहिम अली खानच्या दुसऱ्या चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत त्याचा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे.
सरजमीन
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचा हा दुसरा चित्रपट आहे. यात काजोल व पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही आहेत. ‘सरजमीन’ चित्रपटाची घोषणेपासूनच फार चर्चा होती. चित्रपटाला आयएमडीबीवर वाईट रेटिंग मिळाले आहे, तरीही तो ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. ऑरमॅक्स मीडियाच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांच्या यादीत ‘सरजमीन’ पहिल्या क्रमांकावर आहे.
हाऊसफुल ५
बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी असलेला हाऊसफुल 5 हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. ६ जूनला हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. २२५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या सिनेमाची एकूण कमाई २२० कोटी रुपये होती.
रोंथ
तुम्हाला ओटीटीवर क्राइम व ड्रामा चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा मल्याळम चित्रपट अजिबात चुकवू नका. ‘रोंथ’ हा चित्रपट जिओ हॉटस्टावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. ऑरमॅक्स मीडियाच्या लिस्टमध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांच्या यादीत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे.
कुबेरा
या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत धनुषचा कुबेरा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. यामध्ये धनुषबरोबर रश्मिका मंदाना व जिम सरभही आहेत. २० जूनला रिलीज झालेल्या या चित्रपटाला थिएटर्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता तो प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या कुबेराने भारतात १२७ कोटी रुपयांची कमाई केली होती.
3BHK
या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर 3BHK चित्रपट आहे. शहरात घर खरेदी करायची इच्छा बाळगणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.