आजकाल सस्पेन्स, थ्रिलर व अॅक्शन चित्रपटांची ओटीटीवर क्रेझ पाहायला मिळतेय. प्रेक्षक दमदार कथानक असलेले चित्रपट ओटीटीवर पाहणं पसंत करतात. काही सिनेमांमध्ये तर इतके भयंकर ट्विस्ट असतात की पाहणारे भांबावून जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा क्लायमॅक्स ‘दृश्यम’पेक्षाही दमदार आहे.
या चित्रपटाचं नाव आहे महाराजा. दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या करिअरमधील हा ५० वा चित्रपट प्रचंड गाजला. महाराजाचं फक्त प्रेक्षकच नाही तर समीक्षकांकडूनही खूप कौतुक झालं. आयएमडीबीवर ८.४ रेटिंग असलेला हा २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या दाक्षिणात्य सिनेमांपैकी एक होता.
महाराजा चित्रपटाची कथा विजय सेतुपती साकारत असलेले पात्र व त्याच्या मुलीभोवती फिरते. एका दुर्घटनेत त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो, पण कचरापेटीमुळे मुलीचा जीव वाचतो. नंतर तो त्या कचरापेटीचं नाव ‘लक्ष्मी’ ठेवतो. एकेदिवशी तो पोलीस स्थानकात जाऊन ‘लक्ष्मी’ बेपत्ता झाल्याची तक्रार देतो. तो नेमका एखाद्या व्यक्तीच्या बेपत्ता होण्याची तक्रार देतोय की एखादी वस्तू हरवल्याची याबद्दल सुरुवातीला गोंधळ होतो. त्यानंतर हळुहळू काही गोष्टींचा उलगडा अशा पद्धतीने होतो ज्याची कुणीच कल्पनाही केली नसते.
महाराजा चित्रपटातील कलाकार
महाराजा चित्रपटात मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती आहे. त्याचबरोबर अनुराग कश्यप, सचाना नामीदास, ममता मोहनदास, नटराजन सुब्रमण्यम, भारतीराजा, मुनिषकांत आणि इतरही काही कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निथिलन समीनाथनने केले आहे.
का पाहायचा महाराजा?
‘महाराजा’ हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. एक बाबा आपल्या मुलीला वाचवण्यासाठी काय काय करतो, ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. दमदार स्क्रीनप्ले, कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि रोमांचक कथा याचा सुंदर मिलाफ म्हणजे महाराजा चित्रपट आहे. सस्पेन्सबद्दल बोलायचं झाल्यास तो अजय देवगणच्या ‘दृश्यम’ लाही मागे टाकतो.
कुठे पाहायचा महाराजा?
तुम्ही अद्याप हा सस्पेन्स थ्रिलर ‘महाराजा’ चित्रपट पाहिला नसेल तर तो ओटीटीवर पाहू शकता. महाराजा नेटफ्लिक्सवर पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाचा चक्रावणारा क्लायमॅक्स पाहता तुम्ही तो एकदा तरी नक्की पाहायला हवा.