अक्षय कुमार हे नाव कोणाला माहित नाही अशी व्यक्ती भारतात तरी असेल असं वाटत नाही. पण तुमचा हा अंदाज चुकीचा ठरणार आहे. कारण भारतातच अशी एक व्यक्ती आहे जिला अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना कोण हे माहितीच नाही. पण या जोडप्याला एक असा माणूस भेटला त्याला या दोघांबद्दल काहीच माहित नव्हते आणि आता त्याच माणसावर एक सिनेमाही बनवला जात आहे.

[jwplayer 055bd0lW]

आम्ही बोलतोय ते आर बाल्की यांचा आगामी सिनेमा पॅडमॅनबद्दल. ट्विंकल खन्ना हिच्या को- प्रोडक्शनमध्ये बनण्यात येणाऱ्या या सिनेमाची कहाणी अरुणाचलम मुरुगनाथम यांच्यावर आधारित आहे. मासिक पाळीमध्ये महिलांची शारिरीक स्वच्छता किती आवश्यक असते हे त्यांनी जाणले. त्यांनी स्त्रियांसाठी विशेषत: खेडय़ातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. ट्विंकलने द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद या आपल्या दुसऱ्या पुस्तकात यासंबंधीचा उल्लेखही केला आणि तिथूनच सिनेमाच्या तयारीला सुरुवात झाली. पण या मागची गोष्ट तेवढीच रंजक आहे. अरुणाचलम यांचा शोध घेण्यासाठी ट्विंकलला जवळ जवळ दीड वर्ष लागले.

एकदा अरुणाचलम यांना मलेशिया आणि अमेरिकेमध्ये असताना कळले की ट्विंकल नावाची एक महिला त्यांचा शोध घेत आहे. त्यानंतर लंडनमध्ये हे दोघे भेटले. अरुणाचलम यांना तेव्हा कळले की, ट्विंकल ही राजेश खन्ना यांची मुलगी आहे. याच भेटीत अरुणाचलम, ट्विंकलला म्हणाले की, अक्षय नावाचा माणुसही त्यांच्यावर सिनेमा बनवण्यासाठी स्वामित्व हक्कासाठी त्यांच्या मागे लागला आहे तेव्हा ट्विंकलला जे आश्चर्य वाटले ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

त्यांनंतर अरुणाचलम यांच्यासोबत या सिनेमाशी निगडीत गोष्टींवर चर्चा करताना ट्विंकलने अक्षयला तिच्यासोबत येण्यास मनाई केली. कारण यामुळे प्रसारमाध्यमांना या गोष्टी कळतील अशी तिला भिती वाटत होती. एवढेच नाही तर आपल्या घरी कोईम्बतुरला येई पर्यंत अरुणाचलम यांना हेही माहित नव्हते की आर बल्की कोण आहेत आणि त्यांनी अमिताभ बच्चन आणि करिना कपूरसोबत काम केले आहे. अरुणाचलम यांना हॉलिवूडमध्ये त्यांच्यावर सिनेमा बनावा असे वाटत होते. पण आता अक्षय आणि ट्विंकल हे पॅडमॅन हा सिनेमा बनवत आहेत यासाठीही ते खूश आहेत.

[jwplayer 5wiGmq72]