कलाकार दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला काय सांगायचे आहे ते कलेद्वारे सांगणारे, तर दुसरे म्हणजे कलेला काय सांगायचे आहे ते आपल्याद्वारे सांगणारे! पहिल्या प्रकारच्या कलाकारांमध्ये ‘स्व’चं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे तयारी, प्रभुत्व आणि श्रोत्यांकडून मिळणाऱ्या टाळ्या या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. दुसऱ्या प्रकारच्या कलाकारांमध्ये ‘स्व’ची जागा समर्पणाने घेतलेली असते आणि त्यामुळे श्रोत्यांनी टाळ्या वाजवण्याऐवजी त्यांना अनुभूती प्राप्त होते. पंडित मुकुल शिवपुत्र हे दुसऱ्या प्रकारचे कलाकार! त्यामुळे आठवडय़ाभरापूर्वी त्यांची मुंबईत रंगलेली मैफील हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला!

पंडित मुकुल शिवपुत्र यांची ही मफील तीन कारणांसाठी महत्त्वाची होती. पहिले म्हणजे त्यांची एकसष्टी. दुसरं महत्त्वाचं की त्यांना या मफिलीत ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांनी साथ केली. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे पंडित गंगाधरपंत आचरेकर यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बनविलेली हिंदुस्थानातील पहिली बावीस श्रुतींची हार्मोनियम पं बोरकर यांच्या हस्ते पं मुकुल शिवपुत्र यांना अभ्यास व संशोधनासाठी सुपूर्द करण्यात आली. श्रुतीशास्त्र हा भारतीय संगीताचा मुळारंभ आहे. त्यामुळे एका अर्थाने या सोहळ्याला ऐतिहासिक मूल्य होते.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

या मैफिलीची सुरुवात पंडितजींनी ‘नंद’ रागाने केली. वक्र स्वरसंगती असलेला हा राग तसा मफिलीत कमी ऐकला जातो. शिवाय या वक्र स्वरसंगतीमुळे काही स्वरसंगती वारंवार येण्याची शक्यता असते. परंतु मुकुलजींचा ‘नंद’ हे एका वेगळ्या उंचीवरचं ‘रसायन’ होतं! ‘गोविंद बिन बजाए’ हा पारंपरिक बडा ख्याल झाल्यावर मध्यलय तीनतालात ‘ला दे बीरा म्हाने चुनरी’ ही बंदिश त्यांनी गायली. परंतु हा राग होता ‘नंद केदार’ एक उत्कृष्ट जोड-राग! नंद रागाच्या माहौलनंतर समाविष्ट झालेली केदारची सुंदर छटा वातावरणाची सुंदरता अधिक वाढवत होती. मुळात, जोड-राग गाणं म्हणजे दोन वेगळ्या भावविश्वांचा संगम. ‘नंद’ आणि ‘नंद केदार’नंतर सादर झाला बसंत अंगाचा पटमंजिरी. या रागात ‘ए मदमत्त हुआ’ हा बडा ख्याल तर पुढे बसंत रागात ‘रंग केसरिया सिर पागा, बंध ले’ ही द्रुत तीनतालातील बंदीश सादर झाली.

मध्यंतरानंतर ज्याला आपण उप-शास्त्रीय संगीत म्हणतो, त्या ठुमरी, टप्पा,दादराचे सादरीकरण झाले. संगीत, काव्य आणि अभिनय या तीन पैलूंना योग्य न्याय देणारे हे गानप्रकार मुकुलजींकडून ऐकणं हा एक उत्कृष्ट अनुभव असतो. यावेळी ते ‘रात पिया बिन नींद ना आयी रे’ ही खमाज रागात ठुमरी गायले. त्यानंतर ‘ओ मियाँ वे जानेवाले’ हा काफी रागातील टप्पा सादर झाला आणि मग मिश्र खमाजमधील ‘म तोड लाई राजा, जमुनिया की डारी’ हा दादरा वेगळाच रंग भरून गेला! आणि शेवटी सादर झालेली भरवी ठुमरी म्हणजे जणू पूर्णत्व! ‘छेलवां न डारो गुलाल री’ आणि ‘तमे कोई तेरत हैं घनश्याम’ या दोन रचनांनी मफिलीची समाप्ती झाली. या सगळ्या सादरीकरणात एक सततचे वेगळेपण जाणवले.

मुकुल शिवपुत्र यांची गायकी ही इतरांपेक्षा वेगळी का? तर ती एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी आहे. त्यामुळे आपण त्या गायकीत आलापी तर अनुभवतोच, पण त्याचबरोबर सरगम अनुभवतो, धृपद-अंगाने केलेली बढत अनुभवतो आणि ताना देखील अनुभवतो. शिवाय हे सगळं अनुभवताना ‘भाव’ या संगीताच्या आत्म्याशी जरा देखील तडजोड केली जात नाही. आणि हे सगळं कॅलिडोस्कोपमधल्या सातत्याने बदलणाऱ्या देखाव्यासारखं जाणवतं. या संपूर्ण मफलीत पं. तुळशीदास बोरकर यांची हार्मोनियम साथ उत्कृष्ट होती. या निमित्ताने त्या दोघांची अजब ‘केमिस्ट्री’ अनुभवायला मिळाली.