एकांकिका स्पर्धा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात. याच स्पर्धेतून नवनवे कलाकार उदयास येत असतात. या स्पर्धा म्हणजे कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ. या स्पर्धेतून नवनवे, वास्तवातवादी विषय हाताळले जातात. आज महाविद्यालयांपासून ते जिल्हास्तरीय पातळीवर एकांकिका स्पर्धा होत असतात. मुंबईत आयएनटी ही स्पर्धा मानाची स्पर्धा मानली जाते तर पुणे सारख्या शहरात ‘पुरुषोत्तम’ ही एकांकिका स्पर्धा मानाची मानली जाते. कित्येक कलाकारांचे हे स्वप्न असते एकदा तरी या स्पर्धेत भाग घ्यावा, बक्षिसं जिंकावी. आता याच स्पर्धेच्या आयोजनावर प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी टीका केली आहे.
दिग्दर्शक विजू माने मराठी चित्रपटसृष्टीत कायम चर्चेत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गणपतीसाठी आलेले असतानाची पोस्ट नुकतीच त्यांनी शेअर केली होती. विजू माने यांनी पुरषोत्तम एकांकिका स्पर्धेवर टीका करताना म्हणाले की, ‘निषेध मी ही स्पर्धा पाहिलेली नाही. त्यामुळे एकांकिकेच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही. परंतु या वृत्तीचा मला राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही’?
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं आगामी चित्रपटाचं पोस्टर, ‘हे’ तीन दिग्गज कलाकार शेअर करणार स्क्रीन
नेमकं घडलं काय?
यंदाच्या पुरषोत्तम एकांकिका स्पर्धेत परीक्षकांना एकही एकांकिका दर्जाची वाटली नाही म्हणून त्यांनी पुरषोत्तम एकांकिका करंडक कोणत्याही संघाला दिला नाही. थोडक्यात काय तर परीक्षकांच्या मते एकही एकांकिका पुरषोत्तम करंडकासाठी पात्र नाही. या स्पर्धेत जो संघ पहिला येतो त्याला पुरषोत्तम करंडक देण्यात येतो. या स्पर्धेची सुरवात १९६३ सालापासून करण्यात आली आहे. २०१० सालानंतर या स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली.
दिग्दर्शक विजू माने कायमच आपल्या पोस्टमधून नाट्य, चित्रपटसृष्टीतील खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असतात. विजू माने हे स्वतः एकांकिका स्पर्धा करत आज मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पांडू’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.