बॉलिवूड स्टार आमिर खान याच्या ‘दंगल’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सगळ्याच चित्रपटगृहात हा सिनेमा हाऊसफुल होत आहे. सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतरच या सिनेमाबद्दल अनेक सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. यानंतर जेव्हा सिनेमा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांकडूनही याच पद्धतीच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या.
सोशल मीडियावरही या सिनेमाचे फक्त कौतुकच होत आहे. शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने देशात नोटाबंदीचे वातावरण असूनही चार दिवसांत तब्बल १३२. ४३ कोटींची कमाई केली आहे. ‘दंगल’ने पहिल्या दिवशी २९.७८ कोटी, दुस-या दिवशी ३४.८२ कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल ४२.३५ कोटी तर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी २५.४८ कोटी इतकी कमाई केली. या कमाईत तमिळ आणि तेलगूमधील व्हर्जनच्या कमाईचा आकडादेखील आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ‘दंगल’च्या कमाईचा आकडा ट्विट करून ही माहिती दिली. भारताबाहेर २१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत ६०.९९ कोटींची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘दंगल’ला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ‘दंगल’ने रविवारी ४२.३५ कोटी इतका गल्ला जमविला होता. आतापर्यंत कोणत्याच सिनेमाने रविवारच्या दिवसात इतकी कमाई केलेली नसल्याचे कळते. १०० कोटी क्लबमध्ये आमिरच्या ‘गजिनी’ (२००८), ‘३ इडियट्स’ (२००९), ‘धूम ३’ (२०१३), ‘पीके’ (२०१४) आणि ‘दंगल’ (२०१६) या सिनेमांचा समावेश आहे.
एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे तर दुसरीकडे गीता आणि बबीता कुमारी या फोगट बहिणींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन्ही बहिणींनी पारंपारिक वेशभूषेत हे फोटोशूट केले आहे. पारंपारिक वेशभूषेत या दोन्ही बहिण फारच मोहक दिसत आहेत.


