छायाचित्रकारांकडून सलमानवरील बंदी मागे

खान कुटुंबियांनी अर्पिताला दत्तक घेतल्यापासून त्यांच्या घरात भरभराटीला सुरुवात झाली…

खान कुटुंबियांनी अर्पिताला दत्तक घेतल्यापासून त्यांच्या घरात भरभराटीला सुरुवात झाली, हे सर्वश्रृत आहे. बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता आणि अर्पिताचा मोठा भाऊ सलमान खानच्या जिवनात अर्पिताला खास स्थान आहे. अर्पिताच्या लग्नासाठी सलमान खानने घेतलेल्या मेहनतीवरून याची प्रचिती येते. आपल्या या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी सलमानने जवळजवळ ६४ कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जाते. ‘किक’ चित्रपटाच्या पार्टीत उदभवलेल्या एका प्रसंगावरून छायाचित्रकारांनी सलमान खानचे फोटो काढण्यास नकार देत, त्याच्यावर बंदी घातली होती. अर्पिताच्या लग्नादरम्यान छायाचित्रकारांनी ही बंदी मागे घेतल्याचे समजते. सलमान खानने मनात कोणताही आढमुठेपणा न ठेवता छायाचित्रकारांना अर्पिताच्या लग्नाला आमंत्रित केले होते. सलमानने दर्शविलेला मानाचा मोठेपणा लक्षात घेत छायाचित्रकारांनी त्याच्यावरील बंदी मागे घेतली. ‘किक’ चित्रपटाच्या पार्टीदरम्यान छायाचित्रकारांना सलमान खानची छायाचित्रे काढायची होती. त्यावेळी छायाचित्रकार आणि सलमानच्या अंगरक्षकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने छायाचित्रकारांनी सलमान खानवर बहिष्कार टाकला होता. आता या गोष्टीवर पडदा पडला असून, छायाचित्रकारांकडून सलमानवरील बंदी ऊठविण्यात आल्याचे समजते. निश्चितच सलमानसाठी ही एक आनंददायी बातमी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Photographers lift media ban will now click salman khans pictures