scorecardresearch

‘ऐतिहासिक भूमिकेसाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारीही गरजेची’

‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाटय़ घेऊन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

‘ऐतिहासिक भूमिकेसाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारीही गरजेची’

अभिषेक तेली

‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाटय़ घेऊन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या महानाटय़ाचे शुभारंभाचे प्रयोग नुकतेच संभाजीनगर व नाशिकमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी या महानाटय़ासह विविध गोष्टींबाबत साधलेला हा संवाद..

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटय़ाचे वेगळेपण काय?
आजवर या महानाटय़ाचे दोनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत, परंतु प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नावीन्य येत जाते. करोनाकाळात मनोरंजनाच्या बदललेल्या विविध पैलूंचा आणि काळानुरूप विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा डोळस विचार करून महानाटय़ात अनेक बदल करण्यात आले आहेत. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाने स्वत:चा एक वेगळा दर्जा प्रस्थापित केला आहे. त्यामुळे आता रसिकांना यापेक्षा काय भव्य दाखवता येईल? राज्याभिषेकात त्यांनासुद्धा कसे सामील करून घेता येईल? या गोष्टींचा आम्ही प्रामुख्याने विचार केला. याचसोबत भव्यदिव्य नेपथ्य आणि नेत्रदीपक रोषणाईवर भर देण्यात आला. मला सांगायला अभिमान वाटतोय की, आजच्या घडीला ‘शिवपुत्र संभाजी’ हे महाराष्ट्रातील सगळय़ात मोठे महानाटय़ असून, ते मनोरंजनासोबत आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.

सातत्याने ऐतिहासिक भूमिका करताना प्रत्येक टप्प्यावर कोणती वेगवेगळी आव्हाने येतात?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत असताना त्याअनुषंगाने शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारीही आपल्याला करावी लागते. त्यामुळे पुढच्या भूमिकेवेळी शारीरिक तयारी जरी काही प्रमाणात सारखीच राहत असली, तरी मानसिक व बौद्धिक तयारीमध्ये निश्चितच बदल होतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अभ्यासायला व शिकायला मिळते. तुम्हाला त्या काळातील मानसिक आलेख तयार करायचा असतो. अफझलखानाच्या वधासाठी आणि औरंगजेबाच्या भेटीला जाणारे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या देहबोलीपासून ते भाषाशैलीतील चढ-उतारापर्यंत गोष्टी बदलायला लागतात. कारण १०-२० वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या अमोल कोल्हेमध्येही बदल घडत असतो. वास्तवात इतका मोठा अनुभव मिळाल्यानंतर महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातही काही बदल घडलेच असतील. याचा विचार करत या सगळय़ा गोष्टी व बारकावे भरत जाताना, एक कलाकार म्हणून तुम्ही खूप समृद्ध होत जाता.

मालिका, चित्रपट, नाटक आणि महानाटय़ अशा निरनिराळय़ा माध्यमांत काम करताना काय वेगळेपण जाणवते?
चित्रपट हा अजरामर आहे, तुम्ही सेल्युलोइडवर केलेल्या गोष्टी चिरकाळ टिकतात. परंतु आज मोजकेच मराठीसह इतर भाषेतील चित्रपट सुपरहिट होतात. त्यामुळे या क्षेत्रात अनिश्चितता खूप आहे. मालिका करताना तुम्ही एकाच वेळी कोटय़वधी लोकांच्या घरात थेट जाता, जसे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका तब्बल १५७ देशांपर्यंत पोहोचत होती. पण कोणत्याही मालिकेला एक क्षणभंगुरता असते, ती संपल्यानंतर तिची जागा दुसऱ्या मालिकेने घेतलेली असते. नाटक व महानाटय़ातही काही मर्यादा असतातच, मी एकाच दिवशी ते फक्त १० हजार रसिकांना दाखवू शकतो. परंतु कोणत्याही नाटकाचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा आहे. कारण २०१२ साली हे महानाटय़ पाहिलेले काही रसिक आज २०२३ मध्येसुद्धा तेच महानाटय़ पुन्हा पाहण्यासाठी येतात आणि आम्हाला त्याबाबत येऊन सांगतात.

पडद्यामागच्या झटपट पण तितक्याच अचूक तयारीबद्दल सांगा. याचबरोबर नाटकात तो प्रसंग नेमका काय आहे?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतच्या जीवनप्रवासावर आधारित असणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाटय़ाचा सलग सहा दिवस सारखाच प्रयोग असतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा तो प्रसंग आहे. रसिकप्रेक्षक हे आपले कुटुंबीय आणि लहान मुलांसह महानाटय़ पाहण्यासाठी येत असतात. यामुळे त्यांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांची रक्तबंबाळ प्रतिमा जाऊ नये, ती राजिबडी प्रतिमाच गेली पाहिजे, या अट्टहासापोटी त्या दोन मिनिटांत आमची संपूर्ण टीम कामाला लागते. दोन मिनिटांत मी कपडे बदलून बाहेर येतो. त्यामुळे जेव्हा प्रेक्षक महानाटय़ाच्या मैदानातून घरी जातो, तेव्हा त्यांच्या डोळय़ांसमोर छत्रपती संभाजी महाराजांची राजिबडी प्रतिमा असते.

छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमिका साकारताना, त्यांच्या कोणकोणत्या गुणांचा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात वावरताना फायदा झाला?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना कायम माझ्यावर त्यांच्या गुणांचा प्रभाव पडत जातो. मी महानाटय़ाची प्रेरणा कायम अशी म्हणतो की माती, माता व मातृभूमी यांची सेवा, रक्षण आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी. ही प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून मिळते.

महेंद्र महाडिक लिखित व दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटय़ात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा इतिहास व सर्व टप्पे मांडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि संहितेचा अभ्यास करून कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांनी १८ एकर परिसरात डोळे दिपवून टाकणारे भव्यदिव्य असे तीन मजली किल्ल्याचे नेपथ्य, सहा स्तरांचा रंगमंच आणि शिवसृष्टी उभारली आहे. अग्निरोधक असणारे हे संपूर्ण नेपथ्य फायबर व लोखंडाचे आहे, जे कुठेही दुमडून घेऊन जाता येऊ शकते. सर्व ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करून आणि सुरुवातीला सर्व भूमिकांचे चित्र रेखाटून वेशभूषाकार गणेश लोणारे यांनी महानाटय़ातील सर्व भूमिकांची वेशभूषा साकारली आहे. या महानाटय़ादरम्यान होणारी रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सर्वाचे लक्ष वेधून घेते. तर राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांची घोडेस्वारी आदी विविध प्रसंगांसाठी रंगमंचासह मैदानाचाही वापर करण्यात आला आहे. जेव्हा मैदानातून अमोल कोल्हे घोडय़ावरून जातात, तेव्हा रसिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. या महानाटय़ाची संपूर्ण टीम ही तब्बल सव्वाचारशे जणांची आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली असून डॉ. गिरीश ओक, प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, अजय तपकिरे, रमेश रोकडे, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. तर प्रयोगानुसार स्थानिक कलाकारांनाही महानाटय़ात संधी दिली जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 03:59 IST