अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारी २०१७ ला निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले, पण पोलिसांना अजून त्यांचा मोबाइल सापडलेला नाही. पुढील तपासाला वेग येण्यासाठी पोलिसांसाठी ओम पुरी यांचा मोबाइल सापडणे फार आवश्यक आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ओम पुरी यांचा मोबाइल नंदीता पुरी यांच्याकडे आहे. पण ओम पुरी यांच्या शेवटच्या कार्यात व्यग्र असल्यामुळे पोलिस लवकरच त्यांच्याकडून मोबाइल घेणार आहेत. आपल्या शेवटच्या काळात पुरी यांचे कोणा कोणाशी बोलणे झाले याबद्दल पोलिसांना योग्य ती माहिती मिळेल.
दरम्यान, सोमवारी डॉक्टरांनी ओम पुरी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सादर केल्यानंतर हा संशय आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, ओमपुरी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे आणि मानेचे हाड तसेच डाव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले होते. ओम पुरी यांचे शुक्रवारी ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. ओम पुरी यांचा मृत्यु अनैसर्गिकपणे झाल्याच्या संशयामुळे त्यांच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची पोलिस चौकशी करत आहे.
ओम पुरी यांच्या डोक्याला झालेली जखम दिड इंच खोल आणि ४ सेमी लांब इतकी होती. तसेच मानेचे हाड आणि डाव्या खांद्याला देखील फ्रॅक्चरअसल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. या अहवालानुसार, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुरी ज्या इमारतीमध्ये राहत होते, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील तपास करण्यात येत असून ओम पुरी यांना मृत्यूपूर्वी २४ तास अगोदर जे लोक भेटण्यासाठी आले होते, या लोकांचीदेखील चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ओशिरा पोलिस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिली होती.