काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. नुकतीच ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये गेली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रा सुरू केली. ३५७० किलोमीटरचे अंतर कापून ही यात्रा श्रीनगर जाईल. तिथे गेल्यानंतर ही यात्रा संपेल. भारत जोडो यात्रेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशिवाय सामान्य जनता तसेच इतर क्षेत्रातील लोकही सामील होत आहेत.

आतापर्यंत अभिनेता सुशांत सिंह, अमोल पालेकर, रिया सेन, रश्मी देसाई यांच्यासह अनेक स्टार्स या यात्रेत सहभागी झाले आहेत. अभिनेत्री पूजा भट्टही राहुल गांधींबरोबर तेलंगणामध्ये असताना भारत जोडो यात्रेत १५ किलोमीटर पायी चालली होती. दरम्यान, काँग्रेसच्या या यात्रेवर भाजपा नेत्यांकडून टीका होत आहे. नुकतेच भाजपा नेते नितेश राणे यांनी सेलिब्रिटी पैसे घेऊन या यात्रेत सहभागी होत असल्याचा आरोप केला. यावर आता पूजा भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

“ज्या पद्धतीने सर्व सेलिब्रिटी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत, ते पाहता त्यांना या कामासाठी पैसे दिले जात आहेत, असं दिसतंय. गोलमाल है सब गोलमाल है.’ असं नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं, तसेच त्याने एक व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेज शेअर करत ‘हा पप्पू कधीच पास होणार नाही,’ असंही लिहिलं होतं. त्यावर पूजा भट्टने काय म्हणाली, पाहुयात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा भट्टने काय म्हटलंय?

“त्यांना नक्कीच विचार करण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या मताचा आदर करण्याचाही अधिकार आहे. पण असं असलं, तरी इतरांसोबत जगण्याआधी मी स्वत:सोबत जगायला हवं. बहुमताचा नियम जर कोणत्या गोष्टीला लागू होत नसेल, तर ती गोष्ट म्हणजे माणसाची विवेकबुद्धी”, असं पूजा भट्टने ट्वीट करून म्हटलंय.