गेल्या काही दिवसांपासून डाबर कंपनीच्या नव्या जाहिरातीमुळे बराच गोंधळ सुरु आहे. डाबरने करवा चौथचं निमित्त साधत फेस ब्लीच या त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात केली. या जाहिरातीत दोन मुली एकमेकांसाठी उपवास धरतात आणि उपवास सोडतात. ही जाहिरात पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक संतापले आहेत. टीका झाल्यानंतर डाबरने या जाहिरातीसाठी माफी मागितली आणि त्याचवेळी ही जाहिरात सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली. आता फिल्म मेकर आणि अभिनेत्री पूजा भट्टने डाबरच्या या निर्णयावर कंपनीला फटकारले आहे.
पूजा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पूजा नेहमीच सोशल मीडियावर सामाजिक मुद्यांवर तिचं मत मांडताना दिसते. आता पूजा डाबरच्या लेस्बिनय करवा चौथच्या जाहिरातीवर होणाऱ्या वादाविषयी बोलली आहे. पूजाने यावेळी डाबर कंपनीला फटकारले आहे.
पूजाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “फक्त हेच करत रहा..स्लॅम, बॅम, बॅन! डाबरसारखी मोठी कंपनी त्यांच्या जाहिरातीच्या मागे सुद्धा उभी राहिली नाही. खरंतर मी फेअरनेस क्रीमला मान्यता देत नाही. तरी मी काही बोलली नाही कारण त्यांनी सगळे हे समान आहेत आणि #PRIDE साजरा करण्याचा एक प्रयत्न केला, मग आता का मी माझं मत लपवायचं,” असे पूजा त्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
आणखी वाचा : रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा सीन कापण्याची दिली धमकी
डाबरची ती जाहिरात पाहिल्यानंतर कंपनीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली. मात्र, लोकांनी ती स्वीकारली नाही आणि डाबरचे इतर प्रोडक्ट्स बॅन करण्याची विनंती केली. हे पाहता कंपनीन आणखी एक पोस्ट शेअर करत ही जाहिरात सगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पूजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.