‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्यावर मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी काही आरोप केले. उशिरा येणं, सेटवर नखरे करणं अशी विविध कारणं देत तिला मालिकेतून काढून टाकल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता या सर्व आरोपांवर प्राजक्ताने तिची बाजू मांडली आहे. “मला मालिकेतून काढून टाकलं नाही तर मी स्वत: मालिका सोडली आहे”, असं तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेटवर उशिरा येण्याच्या आरोपांवर प्राजक्ता म्हणाली, “मी सेटवर उशिरा येण्याचा प्रश्नच नव्हता कारण जिथे आम्ही राहत होतो तिथेच शूटिंग सुरू होती. जी रुम मला दिली गेली होती, तिथेच शूटिंग व्हायचं. मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी अशी काही वेगळी रुम नव्हती. ओपन स्पेसमध्ये मेकअप करत होतो.”

परीक्षेची खोटी कारणं दिल्याच्या आरोपांवर तिने पुढे स्पष्ट केलं, “मी प्रोजेक्ट घेतानाच सांगितलं होतं की मला इंजिनीअरिंगची परीक्षा द्यायची आहे. ज्या परीक्षा मे-जूनमध्ये होणार होत्या, त्या करोनामुळे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या गेल्या. शूटिंगला जेव्हा पुन्हा सुरुवात झाली तेव्हाच नेमक्या माझ्या परीक्षा आल्या. मला वाहिनीकडून सांगण्यात आलं की तू परीक्षेला गेलीस तर मालिका थांबवावी लागेल. माझ्यामुळे मालिकेचं नुकसान होऊ नये म्हणून मी परीक्षा दिली नाही.”

आणखी वाचा : “तिला लाजच नाही”; प्राजक्ता गायकवाडवर भडकल्या अलका कुबल

मालिका सोडण्याचं मुख्य कारण सांगताना प्राजक्ता म्हणाली, “मालिकेच्या सेटवरील जवळपास २७ जणांना करोनाची लागण झाली होती. गावकऱ्यांनी अडवलं होतं, शूटिंग थांबवलं गेलं. त्यानंतर मुंबईला शूटिंग करायचं ठरवलं. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा तुझ्यासोबत विवेक सांगळेसुद्धा येणार आहे, असं सांगण्यात आलं. आम्ही एकाच गाडीने प्रवास करणार होतो. तो दोन तास उशिरा आला आणि त्याचं कारण विचारलं तर त्याने सांगितलं जे करोना पॉझिटिव्ह आढळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून येतोय. साहजिकच अख्खं जग एवढी काळजी घेत असताना, त्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार? मी प्रश्न विचारला तर त्याने मला शिव्या दिल्या. तुला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असेल पण मी नाही घेणार, म्हणत त्याने शिवीगाळ केली. ही घटना मी अलकाताईंच्या कानावर दोन-तीन वेळा घातली. त्यांनी फक्त मी बघते असं उत्तर दिलं. त्यांच्याकडून या घटनेची दखल घेतली गेली नाही. त्या स्वत: स्त्री आहे, त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या. विवेक सांगळे ही व्यक्ती समोर आली तरी मला शिवीगाळची घटना आठवते. त्याच्यामुळे खरंतर मी मालिका सोडली.”

“शिवीगाळच्या घटनेनंतरही मी दीड महिना शूटिंग केलं. एक सॉरी जरी म्हटलं तरी मी विचार केला असता. पण त्याने माफी मागितलीच नाही. निर्मात्या आणि एक स्त्री म्हणून अलकाताईंनी या प्रकरणाची दखल घेण्याची गरज होती. तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालता, हे चुकीचं आहे,” असं ती म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta gaikwad on alka kubal allegation regarding aai majhi kalubai serial ssv
First published on: 03-11-2020 at 11:36 IST