सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज सध्या अनेकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमधील सलमान खान सातत्याने गरजूंची मदत करत आहेत. त्याप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रकाश राज हेदेखील संकटात सापडलेल्यांना मदत करत आहेत. यामध्येच आता त्यांनी ३१ मजुरांना घरी परतण्यासाठी मदत केली आहे. प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

देशात जरी लॉकडाउन सुरु असला तरीदेखील सरकारकडून मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळ प्रकाश राज यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ३१ मजुरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी मदत केली आहे. विशेष म्हणजे या मजुरांना प्रकाश राज यांनी आतापर्यंत त्यांच्या फार्महाऊसमध्ये आसरा दिला होता.

“लॉकडाउनमुळे काही जण माझ्या फार्म हाऊसमध्ये अडकले होते. या ३१ मजुरांची त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांना घरी पाठविण्यात एक वेगळाच आनंद आहे. ही तर एक सुरुवात आहे.. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून प्रकाश राज सतत या ना त्या मार्गाने गरजूंची मदत करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मे महिन्यापर्यंत पगार दिला असून त्यांच्या घरी काम करणाऱ्या संपूर्ण स्टाफला सुट्टी दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी अनेक गरजूंची भूकही भागवली आहे.