Prakash Raj on Uddhav Thackeray: महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या राजीनाम्यावर राजकीय क्षेत्रामधून प्रतिक्रिया येत असतानाच मनोरंजन क्षेत्रातील एका नावाजलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्याने उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं असून भाजपाला लक्ष्य केल्याचं पहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> नामकरणाचा निर्णय : शिवसेना म्हणते, “मुस्लिमांनी अयोध्येप्रमाणे संभाजीनगरचा निर्णयही स्वीकारावा; सत्ता असताना फडणवीसांनी…”

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील भूमिकांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केलं असं सांगतानाच प्रकाश राज यांनी ‘चाणक्य’ असं म्हणत भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केलंय. ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग करुन प्रकाश राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात “उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केलं आहे. ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली ती पाहता मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. आज चाणक्य लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दीर्घकालीन आहे. तुम्हाला अधिक शक्ती मिळो,” असं प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बुधवारी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही शिवसेना आमदारांसह सूरत गाठत बंड केले. त्यानंतर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटीला गेले आणि दिवसागणिक बंडखोर आमदारांची संख्या वाढत  राहिली. शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आणि काही अपक्ष आमदार शिंदेगटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले. ‘परत या, चर्चा करून तोडगा काढू’ अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली. पण, शिंदे गटाने त्यास दाद दिली नाही.