Prashant Damle Praised Sankarshan Karhade : एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून ओळखला जाणार चतुरस्त्र कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. टीव्ही, सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून संकर्षणने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, त्यामुळे संकर्षणचं फॅन फॉलोईंग इतकं आहे की, त्याच्या नाटकांना हाउसफुल्ल गर्दी होते. सध्या संकर्षणचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात सुरू आहे.

अशातच नुकताच अभिनेत्याचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त त्याला प्रेक्षक आणि नाटकाचे निर्माते प्रशांत दामलेंकडून खास सरप्राइज मिळालं. प्रशांत दामलेंनी संकर्षणच्या वाढदिवसानिमित्त त्याला सरप्राइज दिलं, ते म्हणजे त्यांनी १०४ प्रयोगांनंतर पहिल्यांदाच संकर्षणचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक पाहिलं आणि यावेळी त्यांनी संकर्षणचं कौतुकही केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MaayRangBhoomi या सोशल मीडिया अकाउंटद्वारे प्रशांत दामलेंनी संकर्षणचं कौतुक केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “नाटकाचे १०४ प्रयोग झाले आहेत. मी सांगतोय ते आणि मी केलंय ते बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण मी आज पाहिल्यांदाच हे नाटक बघत आहे. माझ्या नाटकाचे पुण्यात प्रयोग असतात, तेव्हा संकर्षणने मुंबईत प्रयोग करणं आणि मी मुंबईत असतो तेव्हा त्याने इतर ठिकाणी प्रयोग करणं हे आम्ही ठरवलं आहे. एकमेकांच्या प्रयोगावर परिणाम होऊ नये, म्हणून आम्ही ही युक्ती केली आहे. पण मला सुदैवाने सुट्टी होती, त्यात संकर्षणचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला इथे येऊन आनंदच झाला.”

पुढे प्रशांत दामलेंनी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “या नाटकात एक हेड मास्तरीण आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग यशस्वी होणार याची मला खात्रीच होती. वंदनाताई ही एक अशी अभिनेत्री आहे, जिला स्वत:चा एखादा लाफ्टर पडल्याचंसुद्धा दु:ख होतं आणि समोरच्याचा लाफ्टर गेल्याचंसुद्धा तितकंच दु:ख होतं. मी तिच्याबरोबर अनेक नाटकांत काम केलं आहे. तिच्या कामाची एक पद्धत आहे, त्यामुळे मी नाटक पहायला आलो नाही तरी चालेल अशी मला खात्री होती आणि मला ती खात्री झाली आहे. तिच्या शिस्तीत नाटक अगदी व्यवस्थित चाललं आहे.”

दरम्यान, या नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी संकर्षणला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकगृहात जमलेल्या सर्वांनीच उभं राहून संकर्षणसाठी वाढदिवसाचं समूहगीत गायलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंटमध्येही संकर्षणला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याचं कौतुकही केलं आहे. दरम्यान, ‘कुटुंब किर्रतन’ नाटकात संकर्षणसह वंदना गुप्ते आणि तन्वी मुंडले हे कलाकार मुख्य भूमिकांत आहेत.